"यांना' मिळेल अध्यक्षपद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

राज्यातील सत्ता स्थापन करण्यासाठी निर्माण होऊ पाहत असलेल्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी "स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आम्ही तिघे एकत्र येऊ शकतो,' असे सूचित केले होते.

नगर :  नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या पदावर कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदासाठी 2001 पासून अनुसूचित जातीसाठी एकदा, नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी एकदा, महिलेसाठी एकदा तसेच सर्वसाधारण महिलेसाठी एकदा आरक्षण निघाले होते. मागील आरक्षणावरून या वेळी कोणते आरक्षण निघणार याबाबत आडाखे बांधून त्यावर चर्चा केली जात होती. जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवारी लकी ड्रॉ पद्धतीने मंत्रालयात काढण्यात आली. 

जिल्हा परिषदेत 39 महिला सदस्य 
नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 आहे. मात्र एक सदस्य डॉ. किरण लहामटे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांची जागा रिक्त होऊन आता सदस्यसंख्या 72 असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या 50 टक्के आरक्षणानुसार 37 महिलांना सदस्य म्हणून स्थान मिळालेले आहे. त्यातच सर्वसाधारण जागांवर आणखी दोन महिला जिल्हा परिषदेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे महिला सदस्यांची संख्या 39 आहे. यंदा अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघालेले आहे. आता आरक्षण काय निघणार यावरील चर्चा पूर्ण थांबली असून, अध्यक्ष कोण होणार याबाबतच सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पुन्हा विखे पाटील की आणखी कोणी? 
सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या शालिनी विखे पाटील आहेत. मात्र विखे पाटील अध्यक्षपदी विराजमान झाल्या, त्या वेळी त्यांचे पती व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही कॉंग्रेसमध्ये होते आणि विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते. मात्र या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्याच तिकिटावर ते खासदारही झाले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजयीही झाले. पती आणि पुत्र दोघेही भाजपमध्ये गेले असले, तरी शालिनी विखे पाटील यांनी मात्र कॉंग्रेस पक्ष सोडला नाही. त्यामुळे यंदा त्या पुन्हा कॉंग्रेसतर्फे अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणार, की कॉंग्रेस पक्ष अन्य सदस्याला अध्यक्षपदी संधी देणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही यंदा अध्यपदाची संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

शिवसेनाही आघाडीसोबत येणार? 
राज्यातील सत्ता स्थापन करण्यासाठी निर्माण होऊ पाहत असलेल्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी "स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आम्ही तिघे एकत्र येऊ शकतो,' असे सूचित केले होते. त्यामुळे थोरात यांचाच जिल्हा असलेल्या नगर जिल्हा परिषदेत हे समीकरण जुळणार का आणि शिवसेना आघाडीच्या बाजूने येणार का? तसे झाले तर जिल्हा परिषदेत शिवसेनेला मानाचे स्थान मिळणार का? याबाबतही चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरणच बदलण्याची शक्‍यता व्यक्त होत आङे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र उत्सुकता आहे. 

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल 
कॉंग्रेस ः 23, राष्ट्रवादी कॉंग्रेस ः 19, भाजप ः 14, शिवसेना ः 7, क्रांतीकारी शेतकरी पक्ष ः 5, महाआघाडी ः 2, भारतीय कम्युनिष्ट पक्ष ः 1, शेतकरी विकास मंडळ ः 1, जनशक्ती पक्ष ः 1. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who will be next the President