सोलापूर लोकसभेवर फडकणार कुणाचा झेंडा 

solapur
solapur

सोलापूर : जातीवर निवडणूक झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा देशातील एकमेव असावा असा अंदाज आहे. या ठिकाणी भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना लिंगायत, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दलित तर कांग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दलितांसह इतर जाती-धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघावर कुणाचा झेंडा फडकणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. 

गेल्या 67 वर्षांत सहावेळेचा अपवाद वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचेच प्राबल्य राहिले आहे. आतापर्यंत लोकसभेच्या सोळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यापैकी अकरा वेळा कॉंग्रेसचे खासदार होते. सध्या राखीव असलेला हा मतदारसंघ खुला असतानाही  सुशीलकुमार शिंदे हे निवडून आले होते. गतवर्षी भाजपचे ऍड. शरद बनसोडे यांनी त्यांचा पराभव केला. 

यावर्षी डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी आणि श्री. शिंदे यांच्यात लढत झाली असती तर ती सरळ लढत असती. मात्र वंचित बहुजन आघाडीचे ऍड. आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल केल्याने हा सामना तिरंगी झाला. तिघांही उमेदवारांच्या समर्थकांनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रानोमाळ एक केले. रात्रंदिवस प्रचार केला. त्यांच्या कष्टाला कितपत यश मिळते हे मतमोजणीनंतरच समजणार आहे. शरद पवार, राज ठाकरे, असोसिद्दीन ओवीसी, नितीन गडकरी यांच्या सभांचा कितपत फायदा संबंधित उमेदवारांना होणार हेही या निवडणुकीतून दिसून येणार आहे. 

शिंदे हे किमान 50 हजारांच्या मताधिक्‍क्‍याने निवडून येतील. कांग्रेसच्या मित्रपक्षांबरोबरच श्री. शिंदे यांना मानणाऱ्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात कांग्रेसच्या यशासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांच्या कष्टाचे रुपांतर निश्‍चित यशात होईल. 
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, काँग्रेस 

सोलापुरात भाजपची विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठीच श्रेष्ठींनी डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वेळी सोलापुरात कमळ फुलणार हे नक्की. 
- प्रा. अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजप 

ऍड. बाळासाहेबांना केवळ दलितच नव्हे तर सर्व घटकातील मतदारांनी पाठिंबा दिला. सोलापुरकरांना पर्याय हवा असल्याने त्यांना बाळासाहेबांच्या रुपाने मिळाला. त्यामुळे वंचितला निश्‍चित यश मिळणार. 
- आनंद चंदनशिवे, प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी 

सोलापूरचे आतापर्यंतचे खासदार 
1952 ः शंकरराव मोरे (शे.का.प.) 
1957 ः बाळासाहेब मोरे (संयुक्त महाराष्ट्र समिती) 
1962 ः एम. बी. काडादी (कॉंग्रेस) 
1967 ः सूरजरतन दमाणी (कॉंग्रेस) 
1971 ः सूरजरतन दमाणी (कॉंग्रेस) 
1977 ः सूरजरतन दमाणी (कॉंग्रेस) 
1980 ः गंगाधरपंत कुचन (कॉंग्रेस) 
1984 ः गंगाधरपंत कुचन (कॉंग्रेस) 
1989 ः धर्मण्णा सादूल (कॉंग्रेस) 
1991 ः धर्मण्णा सादूल (कॉंग्रेस) 
1996 ः लिंगराज वल्याळ (भाजप) 
1998 ः सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस) 
1999 ः सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस) 
2003 ः प्रतापसिंह मोहिते-पाटील (भाजप-पोटनिवडणूक) 
2004 ः सुभाष देशमुख (भाजप) 
2009 ः सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस) 
2014 ः ऍड. शरद बनसोडे (भाजप)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com