कोण होणार ‘झेडपी’चा नवीन अध्यक्ष?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

आचारसंहितेत मुदतवाढ हाच एक पर्याय
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्ये लागणार आहे. त्यामुळे आचारसंहितेत अध्यक्षांची निवड होण्याची शक्‍यता फारच कमी आहे. अशावेळी मुदतवाढ हाच एक पर्याय होऊ शकतो. तरीही आरक्षण सोडत मात्र, आचारसंहितेपूर्वीच होणार आहे. किमान विधानसभा निवडणुकीनंतर का होईना अध्यक्षपदाची संधी मिळेल, यातूनच नव्याने होणाऱ्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होण्याची वाट सर्वजण पाहात आहेत. सप्टेंबरमध्ये विद्यमान अध्यक्षांना अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे नव्याने पडणाऱ्या आरक्षणात कोणाची वर्णी लागणार, याचे तर्कवितर्क जिल्हा परिषदेच्या गोटातून वर्तविले जाऊ लागले आहेत. आतापर्यंत सर्व आरक्षणे झाली असून, अनुसूचित जातीचे आरक्षण मात्र पडलेले नाही. त्यामुळे या प्रवर्गातून निवडून आलेले शिवाजी सर्वगोड आणि बापूराव जाधव हे दोघे अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. त्यांच्यापैकी पक्ष कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, त्यांची वर्णी अध्यक्षपदावर लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर सध्या फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर हे आहेत. येत्या २१ सप्टेंबरला त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. आतापर्यंत ओबीसी, खुले, अनुसूचित जमाती या प्रवर्गाची आरक्षणे झालेली आहेत. पण, अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडलेले नाही. आता जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणांची सोडत होईल. त्यामुळे आजपर्यंत ज्या प्रवर्गाला संधी मिळालेली नाही, अशा प्रवर्गातील सदस्यांना अध्यक्ष होण्याची ही संधी आहे. आगामी अडीच वर्षे ही संधी मिळणार आहे. पण, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने विद्यमान अध्यक्षांना आगामी तीन महिने मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीवर शासनाने विचार केलेला नाही. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी आरक्षण सोडत लवकरच होणार आहे. 

सातारा जिल्हा परिषदेत आतापर्यंत अनुसूचित जातीचे आरक्षण पडलेले नाही. हेच आरक्षण नवीन सोडतीत पडेल, यातूनच अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे शिवाजी सर्वगोड आणि बापूराव जाधव यापैकी एकाला संधी मिळणार आहे. श्री. सर्वगोड हे जिल्हा परिषदेच्या औंध गटातून निवडून आलेले असून, ते सध्या समाजकल्याण सभापती आहेत.

तर श्री. जाधव हे राष्ट्रवादीचे सदस्य असून, ते जिल्हा परिषदेच्या गोकुळ तर्फ हेळवाक गटातून निवडून आलेले आहेत. ते माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे समर्थक असून, चळवळीतील कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी मिळणार आहे. पण, राजकीय वजन कोणाचे पडेल, तोच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसणार आहे. 

सध्यातरी विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ देण्याबाबत मागणी पुढे आली आहे. पण, त्याकडे शासनाने फारसे लक्ष दिलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is ZP New Chairman Politics