अख्खी सांगली झाली भगवीमय...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

गेल्या महिन्याभरापासून कार्यकर्त्यांनीही जिल्हा पिंजून काढला असून, एका लाख धारकरी मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज संघटनेकडून व्यक्त केला आहे. उद्या (ता. 28) सकाळी दहा वाजता पुष्पराज चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे बुधवारी (ता. 28) काढण्यात येणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी सुरु असून, अख्खी सांगली भगवीमय झाली आहे. ठिकठिकाणी संस्थापक संभाजीराव भिडे यांचे फलक लावण्यात आले असून, 'सन्मान मोर्चा'साठी आवाहन केले जात आहे.

गेल्या महिन्याभरापासून कार्यकर्त्यांनीही जिल्हा पिंजून काढला असून, एका लाख धारकरी मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज संघटनेकडून व्यक्त केला आहे. उद्या (ता. 28) सकाळी दहा वाजता पुष्पराज चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

सांगलीसह एकाचवेळी सकाळी दहा वाजता कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई, यवतमाळ, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि पणजी याठिकाणीही मोर्चे निघणार आहे. दरम्यान, मोर्चाला परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. जिल्हाध्यक्ष बी. बी. घाडगे यांनी पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांना याबाबतचे निवेदनही दिले आहे. 

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा मागे घ्यावा आणि त्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाला विविध राजकीय संघटनांबरोबरच 48 संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी दहा वाजता पुष्पराज चौकातून मोर्चाला सुरवात होईल. स्टेशन चौकात सांगता होईल. प्रातिनिधिक सात कार्यकर्ते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांना निवेदन देतील. त्यानंतर मोर्चाची सांगता होईल. 

अशी असेल व्यवस्था...

शिवप्रतिष्ठानतर्फे एक लाख धारकरी मोर्चात सहभागी होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे. आंबेडकर स्टेडियम, कल्पद्रूम क्रीडांगण याठिकाणी पार्किंगची केले जाईल. तसेच मोर्चात ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. उन्हाचा तडाका अधिक असल्याने जागोजागी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Whole Sangli will be Bhagvimay