सातारा पालिका सभेतून सीओंनी का केले पलायन ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

सातारा पालिकेची आजची (गुरुवार, ता. सात) विशेष सभा वादळी झाली. सभेतून बाहेर जाणारे सीओं आजपर्यंत पाहिले नाहीत. ते पुन्हा सभागृहात येता कामा नयेत. त्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी संतप्त नगरसेवकांनी केली.

सातारा : साताऱ्यातील रस्त्यांची दुरवस्था होऊनही प्रशासनाला गांभीर्य नाही, सीओ हरवलेत त्यांना शोधतोय, त्यांनी नगरसेवकांची चेष्टा चालविली आहे, त्यांना पालिकेचे वाटोळे करायचे आहे, सीओ सातारकरांच्या जीवाशी खेळ खेळताहेत, अशा तोफा नगरसेवकांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर डागल्या. ही भाषा ऐकेरीवर आल्याने श्री. गोरे यांनी निट बोला असा इशारा दिला अन्‌ चक्‍क सभागृहातूनच पलायन केले.
 
सातारा पालिकेची आजची (गुरुवार, ता. सात) विशेष सभा वादळी झाली. जैवविविधता व्यवस्थापन समिती गठित करण्यासाठी आयोजित केलेल्या या सभेत रस्त्यांतील खड्डे, डेंग्यूची साथ हे मुद्दे गाजले. पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी सीओंवर घणाघात केले. ""सीओंना पालिकेचे वाटोळे करायचे आहे. नगरपालिकेत ते थांबत नाहीत. दिवाळीत कंत्राटदारांच्या बिलांवर सह्या केल्या नाहीत. दहावेळा फोन करूनही काल बैठकीला आले नाहीत,'' असा गंभीर टीका आंबेकरांनी केली. त्यावर सुहास राजेशिर्के यांनी बिलांवर सह्या का केल्या नाहीत, असा खडा सवाल केला. यामुळे आंबेकर, राजेशिर्के आणि गोरे यांच्या जुंपली. ही भाषा ऐकेरीवर आल्याने "नीट बोला' असे सांगत गोरे यांनी सभागृहातून पलायन केले.
 
गोरेंच्या निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी संतप्त झालेल्या बहुतांश नगरसेवकांनी केली. सीओंनी सभागृहाला न शोभणारे कृत्य केले. त्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय की नगरपालिका हेच कळत नाही. 40 वर्षांत सभागृहातून उठून जाणारे पहिलेच सीओ पाहिले. त्यांना काळे फासून बाहेर काढले पाहिजे. ते पुन्हा सभागृहात येता कामा नयेत. उध्दट वागतात. त्यांची तातडीने बदली करावी. नाही तर पालिकेची पायरी चढू देणार नाही, असा जोरदार टीका करत अशोक मोने यांनी निषेधाचा ठराव मांडला. त्यास सभागृहाने मंजुरी दिली.
 
विनोद खंदारे यांनी अवकाळी पाऊस, कंत्राटदारांच्या खराब कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. डेंग्यूचा प्रचंड फैलाव झाला असतानाही आजपर्यंत फॉगिंग केले नाही, हे दुर्दैव आहे, असे आरोप केले. दत्तात्रेय बनकर म्हणाले, ""दोन्ही राजेंनी रस्त्याच्या कामांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, त्याचे आराखडा अद्यापही बांधकाम विभागाने केला नाही. रस्तेही निश्‍चित केले नाहीत. बांधकाम विभाग झोपला आहे. अभियंत्यांना शहरातील रस्त्यांची लांबी, रुंदी तरी माहिती आहे का? आमचे ऐकणार नसाल तर तुम्हीच प्रशासन चालवा. केडर आणि रेग्यूलर असे दोन प्रशासनात विभाग पडले आहेत. आमच्यापेक्षा तुमच्यात जास्त राजकारण आहे. तुम्ही पाट्या टाकण्याचा धंदा करू नका.'' दरम्यान, सभेला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Chief Officer escaped from Satara Municipality Meeting ?