रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट खरेदीनंतर मंजुरीसाठी सभा कशाला?

बलराज पवार 
Tuesday, 28 July 2020

कोरोनाच्या तातडीने तपासण्यांसाठी रॅपिड अँटिजन टेस्ट किट खरेदीचा विषय आज स्थायी समितीच्या विशेष सभेत गाजला.

सांगली : कोरोनाच्या तातडीने तपासण्यांसाठी रॅपिड अँटिजन टेस्ट किट खरेदीचा विषय आज स्थायी समितीच्या विशेष सभेत गाजला. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीच या विषयावर विषयपत्र नाही, खरेदीपश्‍चात मंजुरीसाठी सभा कशाला घेतली या प्रश्‍नावरुन प्रशासनाला धारेवर धरले.

भाजपचे गजानन मगदूम, गणेश माळी, भारती दिगडे आदी सदस्यांनी जाब विचारल्यावर अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही खरेदी केल्याचे सभापती निरंजन आवटी यांनी स्पष्ट केले. त्यानुसार या विषयाला मंजुरी देण्यात आली. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महापालिकेकडून रॅपिड अँटीजेन चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामधून पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. या चाचण्यांसाठी महापालिका प्रशासनाने यापूर्वी चार हजार किट खरेदी केले होते. त्यानंतर आता 10 हजार नवे किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या खर्चास मंजुरीसाठी आयुक्तांच्या सूचनेनुसार स्थायी समितीची विशेष महासभा बोलावली होती. 

गेल्या शुक्रवारीच स्थायी समितीची सभा झाली होते. आज तातडीने विशेष सभा का बोलावली. प्रशासनाला याचे विषयपत्र मागूनही मिळाले नाही. यावरुन भाजपचे गजानन मगदूम, अनारकली कुरणे, भारती दिगडे या सदस्यांनी सुरुवातीलाच प्रश्न उपस्थित केले. शिवाय स्थायी समितीमध्ये नसणाऱ्या महापौर, पदाधिकाऱ्यांनाही सभेत सहभागी करुन घेतले आहे. धोरणात्मक निर्णय असेल तर हा विषय विशेष महासभा घेऊन तिकडेच का पाठवला नाही. कोरोनाबाबत आणखी काही खरेदी करायचे असेल तर ते एकदाच करा. स्थायीच्या मंजुरीची गरजच काय? असेही सवाल उपस्थित केला. 

आयुक्त कापडणीस यांनी खुलासा करताना सांगितले, की कोणताही गैरकारभार नाही. महापालिकेची यंत्रणा जीव धोक्‍यात घालून काम करीत आहे. कोरोना रोखण्यासाठी चाचण्या करण्याची गरज असल्याने अगोदर कीट खरेदी केले आहेत. त्याला तांत्रिक मंजुरीची गरज होती. त्यासाठीच हा विषय आणला आहे. त्यानुसार सभापती आवटी यांनी या विषयाला मंजुरी दिली. कंटेन्मेंट झोनचा आकार कमी करण्याबाबत योगेंद्र थोरात, अभिजित भोसले, शेडजी मोहिते यांनी प्रश्‍न उपस्थित केला. जेथे रुग्ण सापडला आहे तेवढ्यापुरताच करण्याची मागणी केली. कापडणीस यांनी याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 

अहवाल जनतेसमोर आणा... 
अभिजित भोसले म्हणाले,""सध्या घेण्यात येत असलेल्या अँटिजेन टेस्टबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु आहे. परंतु गवळी गल्लीत घेतलेल्या अँटिजन टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते. त्यांची आरटीपीसीआर तपासणीही करण्यात आली. तेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या चाचण्या अत्यावश्‍यक आहेत, विश्वासार्ह आहेत, हे जनतेसमोर अहवाल आणून स्पष्ट करा. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why meeting for approval after purchase Kit?