ऐपत नसताना दवाखान्यात आणले कशाला?  डॉक्‍टरच्या प्रश्‍नाने शिक्षक हैराण; दुप्पट आकारलेले बिल कमी केल्याने मुक्ताफळे 

अजित झळके
Tuesday, 29 September 2020

कोरोना बिलाचे ऑडिट करून ते निम्म्यावर आणण्याच्या रागातून एका डॉक्‍टराने रुग्णाच्या मित्र शिक्षकाला "ऐपत नसताना दवाखान्यात आणता कशाला?' अशा शब्दांत हिणवले. हा प्रकार त्या शिक्षकाने सोशल मीडियातून समाजासमोर आणला आहे.

सांगली ः कोरोना बिलाचे ऑडिट करून ते निम्म्यावर आणण्याच्या रागातून एका डॉक्‍टराने रुग्णाच्या मित्र शिक्षकाला "ऐपत नसताना दवाखान्यात आणता कशाला?' अशा शब्दांत हिणवले. हा प्रकार त्या शिक्षकाने सोशल मीडियातून समाजासमोर आणला आहे. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील या संतापजनक प्रकारावर जोरदार टीका होत आहे. प्राथमिक शिक्षक व जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष अमोल शिंदे यांच्याबाबत हा प्रकार घडला. 

श्री. शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या एका मित्राला कोरोनाची बाधा झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले. पाच दिवसांनंतर ते बरे झाले. तेथून त्यांना सोडण्यात आले. त्यांचे बिल झाले तब्बल 1 लाख 10 हजार रुपये. त्याबाबत थोडी शंका आली. त्यांनी एका मित्राला फोन करून याबाबत विचारणा केली. त्यांनी ऑडिट करून घेण्याचा सल्ला दिला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. ऑडिटरने पंचनामाच केला. त्यात बेडसाठी दुप्पट दर आकारण्यात आला होता.

ऑक्‍सिजन बेडचे पैसे वेगळे आणि ऑक्‍सिजनचे वेगळे लावले होते. पीपीई कीटसाठी दिवसाला 2200 रुपये आकारणी केली होती. बेडसाठी पाच दिवसांचे तब्बल 20 हजार रुपये आकारले होते. नेहमीच्या पेक्षा दुप्पट असा हा दर होता. याबाबत विचारणा केल्यानंतर रुग्णालयाने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र जेव्हा ऑडिट झाले तेव्हा त्यांनी बिल केले फक्त 43 हजार रुपये. म्हणजे एकूण 67 हजार रुपये जादा आकारण्यात आल्याचे उघड झाले. 

याच रुग्णाबाबत दुसरा प्रसंग- त्यांची शिल्लक औषधे परत घेण्यास मेडिकल सेंटरने नकार दिला. त्याला विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असू शकतो, आम्ही ती परत घेणार नाही, असे सांगितले गेले. त्यावर श्री. शिंदे यांनी एका वकील मित्राला फोन केला. त्यानंतर औषधे घेतली गेली. हे घडल्यानंतर श्री. शिंदे यांच्या परिचयातील एका डॉक्‍टरने फोन केला आणि "ऐपत नव्हती तर दवाखान्यात आणायचे कशाला?' असा राग काढला. श्री. शिंदे यांनी संयम दाखवला; मात्र त्यांच्या पोस्टने आता हे रुग्णालय आणि मुक्ताफळे उधळणारे डॉक्‍टर चर्चेत आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why was he brought to the hospital ? Teacher annoyed by doctor's question