Vidhan Sabha 2019 "श्रीं' च्या प्रचारात "सौं'ची आघाडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

सातारा जिल्ह्यात उमेदवारांच्या माता, भगिनी, वहिनी, मुलेही निवडणूकीच्या रणसंग्रामात.

सातारा : महाआघाडी विरुद्ध महायुतीच्या रणसंग्रामात नेत्यांनी झोकून देऊन प्रचारास सुरवात केली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सर्व मतदारसंघांत उमेदवारांच्या कुटुंबीयांनी विशेषत: महिलांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराची पत्नी पतीच्या विजयासाठी झटू लागली आहे. तर काही ठिकाणी बहीण, वहिनी आणि आईदेखील प्रचारात उतरली आहे. 

सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्या स्वतंत्र पदयात्रा, कोपरासभांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत. सातारा शहरात त्यांनी प्रचाराचा धडाका उडवून दिला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांची पत्नी विद्यादेवी, वहिनी धन्वंती पवार याही प्रचारात सहभागी झाल्या आहेत.

कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची पत्नी वैशाली शिंदे यांनीही प्रचारात आघाडी घेतलेली आहे. त्यांनी मतदारसंघातील महिलांसह संपर्क, पदयात्रा, कोपरा सभांवर भर दिला आहे. भाजपचे उमेदवार महेश शिंदे यांची पत्नी प्रिया शिंदे याही पदयात्रा व महिलांच्या बैठका घेऊन संपर्क करत आहेत.
 
वाईत राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील यांची पत्नी अर्चना पाटील, मुलगा आहन, थोरले बंधू मिलिंद पाटील यांची पत्नी उज्वला पाटील, तसेच नितीन पाटील यांचा चिरंजीव क्षितीज पाटील प्रचारात सहभागी आहेत. महिलांच्या स्वतंत्र गाठीभेटी व बैठका घेऊन त्यांनी संपर्क सुरू केला आहे. तसेच मकरंद पाटील यांच्या मातोश्री सुमन पाटील याही प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. तसेच भाजपचे उमेदवार मदन भोसले यांची पत्नी डॉ. नीलिमा भोसले आणि मुलगी सुरभी याही प्रचारात सहभागी झाल्या आहेत. महिला मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासोबतच पदयात्रा आणि कोपरा सभांच्या माध्यमातून मार्गदर्शनही करत आहेत.
 
कऱ्हाड उत्तरमध्ये शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील कदम यांची पत्नी सुनीता कदम प्रचारात सहभागी आहेत. त्या स्वतंत्रपणे पदयात्रेच्या माध्यमातून महिला मतदारांशी संपर्क साधत आहेत. तसेच अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांची पत्नी क्षमता घोरपडे तसेच आई मंगल घोरपडे याही प्रचारात सहभागी झाल्या असून, पदयात्रा आणि कोपरा सभांच्या माध्यमातून महिला मतदारांशी संवाद साधत आहेत.
 
कऱ्हाड दक्षिणेतील कॉंग्रेसचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी सत्वशिला चव्हाण, स्नुषा गौरी चव्हाण प्रचारात सहभागी झाल्या आहेत. तसेच भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांची आई उत्तरा भोसले, पत्नी गौरवी भोसले याही प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. तसेच अपक्ष रयत संघटनेचे उमेदवार ऍड. उदयसिंह पाटील यांची पत्नी सुचित्रादेवी पाटील याही प्रचारात सहभागी झाल्या आहेत.
 
पाटण मतदारसंघात शिवसेनेचे उमदेवार शंभूराज देसाई यांची पत्नी यावेळेस अद्याप प्रचारात सहभागी झालेल्या नाहीत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांची पत्नी यशस्वीनीदेवी पाटणकर याही हळदी-कुंकू व भेटीगाठीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत.
 
माण मतदारसंघात भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांची पत्नी सोनिया गोरे प्रचारात सहभागी झाल्या आहेत. त्या पदयात्रा आणि कोपरासभांच्या माध्यमातून महिला मतदारांशी संवाद साधत आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांची पत्नी सोनल गोरे, बहीण सुरेखा पखाले याही प्रचारात सहभागी झाल्या आहेत. सर्वपक्षीय तिसऱ्या आघाडीचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांची पत्नी अनुराधा देशमुख आणि मुलगी हर्षदा देशमुख यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे माणमध्ये महिलांच्या प्रचाराने रंगत आली आहे.
 
फलटण मतदारसंघात राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण यांची पत्नी वैशाली चव्हाण आणि भाजपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांची पत्नी जयश्री आगवणे याही प्रचारात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी पदयात्रेसह, महिलांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे.

याबराेबरच लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची पत्नी दमयंतीराजे भोसले याही आता प्रचारात सहभागी झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife of candidates started election campaignig in their areas