भटक्‍या कुत्र्यांमुळे वन्यप्राणी संकटात! 

परशुराम कोकणे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

भटक्‍या कुत्र्यांमुळे मानवी जीवन धोक्‍यात आल्याचे सिद्ध झाले असतानाच,  साेलापूर शहरापासून जवळ असलेल्या माळरानावरील, अभयारण्य परिसरातील वन्यप्राणीही संकटात आल्याचे दिसून येत आहे.

 

सोलापूर : गल्लीबोळात गटागटाने भटकणाऱ्या कुत्र्यांची दहशत आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली आहे. भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याचेही आपण पाहिले आहे. या भटक्‍या कुत्र्यांमुळे मानवी जीवन धोक्‍यात आल्याचे सिद्ध झाले असतानाच, शहरापासून जवळ असलेल्या माळरानावरील, अभयारण्य परिसरातील वन्यप्राणीही संकटात आल्याचे दिसून येत आहे.

हरिण, खोकड, ससे यांसह इतरही वन्यप्राण्यांच्या प्रजातींवर भटक्‍या कुत्र्यांचा परिणाम होत आहे. निसर्गचक्रात प्रत्येक घटकाची महत्त्वाची भूमिका असते. कळत-नकळत यातील काही घटकांना बाधा झाली तर पूर्ण निसर्गचक्र बिघडून जातं. माणसं आपल्या फायद्यासाठी निसर्गाचं खूप नुकसान करत आहेत. यात भर म्हणून की काय, अलीकडे भटकी कुत्री सुद्धा वन्यजीवांना धोका निर्माण करत आहेत.

भटकी कुत्री सर्रास संरक्षित माळरानांवर, जंगलांमध्ये जातात आणि वन्यजीवांची शिकार करताना दिसून येत आहेत. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह वाइल्ड लाइफ फोटोग्राफी आणि अभ्यासाच्या निमित्ताने फिरणारे वन्यजीवप्रेमी हे संकट जवळून पाहात आहेत. 

संरक्षित वनांमध्ये भटक्‍या कुत्र्यांचा वावर थांबलाच पाहिजे. माळरान, अभयारण्य परिसरात भटक्‍या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर अंकुश गरजेचा आहे. भटक्‍या कुत्र्यांची ही संख्या वाढत राहिली तर भविष्यात अन्नाच्या शोधात वन्यजीवांसह माणसंही शिकार होतील यात शंका नाही. शासनाकडून वन संवर्धनावर कोट्यवधींचा खर्च होत असताना, भटक्‍या कुत्र्यांच्या गंभीर समस्येकडेही लक्ष देण्याची गरज आहे. 
 

हे आहेत संकटग्रस्त : 
- हरिण, खोकड, ससा, माळरानावरील पक्षी, पंखा काढणारा सरडा यांसह इतर सरपटणारे प्राणी. 

कोणत्या परिसरात आहे संकट? : 
- नान्नज अभयारण्य, गंगेवाडी, हिरज, तिऱ्हे, कुंभारी, बोरामणी आणि जिल्ह्यातील सर्वच माळरानांचा परिसर. 
 
का उद्‌भवली ही समस्या? 

- माळरान, शेतांमध्ये वाढती लोकवस्ती. 
- वस्तीवर सुरक्षेसाठी पाळली जात आहेत कुत्री. 
- माळरान, अभयारण्य परिसरात वाढल्या मटणाच्या पार्ट्या 
- खाल्लेल्या मटणाची हाडे, खरखटं तिथेच टाकले जातेय. 
- भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नाही कोणाचेही नियंत्रण. 

भटक्‍या कुत्र्यांमुळे जैवविविधतेच्या साखळीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. माळरानावर कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांकडून खोकडांची बिळे उकरली जात आहेत. पाळीव कुत्र्यांना वन्यजीवांची शिकार करण्याचा अधिकार नाही. पाळीव प्राणी आणि जंगलातील प्राणी यात फरक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे किंवा आवश्‍यकतेनुसार मारून टाकण्याचा अधिकार वन विभागाला आहे. 
- शिवानंद हिरेमठ, वन्यजीव अभ्यासक 
 

माळरानावर भटक्‍या कुत्र्यांकडून पाठलाग करून हरिण, खोकड, सशांची शिकार होत आहे. कुत्री एकत्र येऊन फिरत असतात, त्यामुळे ते सहजतेने शिकार करू शकतात. काही प्रसंगी कुत्र्यांनी घोळका करून लांडग्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. भटक्‍या कुत्र्यांमुळे वन्यजीवांची शिकार होतच आहे, शिवाय भटक्‍या कुत्र्यांचे रोगही वन्यजीवांमध्ये पसरत आहेत. भटक्‍या कुत्र्यांना मारणं हा उपाय होऊ शकत नाही, पण त्यांच्या पैदासीवर नियंत्रण आणायलाच हवे. 
- प्रशांत पाटील, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर 
 

भटक्‍या कुत्र्यांमुळे वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे हे खरे आहे. पाळीव आणि वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने गावोगावी असलेल्या भटक्‍या कुत्र्यांचा शोध घ्यावा लागेल. त्यावर कायद्यानुसार काहीतरी उपाय करणे आवश्‍यक आहे. सोलापूर परिसरातील माळरानावर भटक्‍या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी वन विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. या अनुषंगाने काही सूचना असतील तर वन्यजीव प्रेमींनी वन विभागाशी संपर्क साधावा. 
- प्रवीणकुमार बडगे, उप वनसंरक्षक, वन विभाग, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wild animals in danger due to stray dogs!