वन्यप्रेमींनी अनुभवले रात्रीचे जंगल

वन्यप्रेमींनी अनुभवले रात्रीचे जंगल

कोल्हापूर - जंगलातला दिवस कसा मावळत जातो. काही वेळापूर्वी हिरवेगार दिसणारे आजूबाजूचे जंगल कसे गूढ जाणवू लागते. अंधार होत होत असताना पाणवठ्यावर वन्य जीवांची पावले पावले कशी वळू लागतात, याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी वन विभागाने ‘निसर्गानुभव’ या कार्यक्रमाद्वारे वन्यप्रेमी नागरिकांना दिली. यासाठी राधानगरी दाजीपूर अभयारण्यात पाणवठ्याच्या ठिकाणी २९ मचाण बांधले होते. या मचाणावर रात्रभर बसून निरीक्षणे नोंदवली गेली. मचाणावर बसलेल्या बहुतेकांना गव्यांचेच ठळक दर्शन घडू शकले. 

सकाळी वनविभागाच्या कार्यालयातून सर्वांना त्यांना नेमून दिलेल्या मचाणाकडे रवाना करण्यात आले. त्यांच्यासोबत वन विभागाचे कर्मचारीही होते. साधारणपणे पाच वाजण्याच्या सुमारास सर्वजण मचाणावर बसले. रात्र झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत उतरायचे नाही, अशा सक्त सूचना सर्वांना दिल्या होत्या. आम्ही दाजीपूरच्या माळेवाडी डॅमवर बांधलेल्या मचाणावर होतो. तिन्ही बाजूंना जंगल व मध्ये माळेवाडी डॅमचे पाणी या तिन्हींपैकी कोणत्याही एका बाजूने गवे पाणवठ्यावर येण्याची शक्‍यता होती.

आमच्यासोबत वन विभागात ३३ वर्षे सेवा केलेल्या शांताराम पाटील हा ज्येष्ठ वनमजुर होता. त्याला जंगलातले बारीक सारीक बारकावे माहिती होते. त्याने साधारण अंधार पडताच आम्हाला एकही शब्द न बोलता शांत बसून राहाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मोबाईल सायलेंट करायला लावले. बरोबर पावणे सहाच्या सुमारास डॅमच्या पश्‍चिम बाजूने एक गवा आला. पण कदाचित त्याला मचाणावर कोणी तरी असल्याचा अंदाज असवा. त्यामुळे तो गवा पाणवठ्याकडे न येता परत गेला. 

त्यानंतर मात्र पंधरा वीस मिनीटांनी डॅमच्या दक्षिण बाजूने एक गवा व त्या पाठोपाठ सहा गवे झाडीतून बाहेर आले. व शांतपणे चरत चरत पाणवठ्यावर आले. पुन्हा शांतपणे आल्या दिशेने परतले. त्यानंतर पुन्हा पंधरावीस मिनिटांनी आमच्या मचाणापासून शंभर फुटावर झाडीतून एका गव्याच्या हंबरण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला.

आम्ही त्या दिशेने नजर रोखली. काही वेळाने एका पाठोपाठ एक असे १३ गवे बाहेर आले. त्यात तीन पिले होती. एका ओळीत हे गवे पाणवठ्यावर गेले. पाणी पिता पिताच बिथरले व काही अंतरावर बाजूला धावत गेले. पुन्हा पाणवठ्यावर आले व आल्या वाटेने परत न जाता दुसऱ्या वाटेने परत गेले. ‘निसर्गानुभव चा अनुभव घेण्यासाठी ९० जण सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी २९ मचाणे बांधली होती. यातल्या दोन मचाणांवर तर रात्रभर महिला वनरक्षक व जंगलप्रेमी तरुणीच होत्या. 

सकाळी आठ वाजता सर्वजण मचाणावरून उतरले. मचाणावरील बहुतेकांना गव्यांचेच दर्शन घडले. भेकर, सांबर, रानमांजर याचे काही ठिकाणी दर्शन घडले. वन अधिकारी प्रशांत तेंडूलकर, धुमाळ, राजू सावंत, यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. 

या निसर्गानुभवाचा उद्देश वन्यप्राणी गणना नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. या निमित्ताने लोकांना जंगल अनुभवता यावे. त्यांनी निरिक्षणे नोंदवावीत. त्यांच्या निरीक्षणावरून वन्य प्राण्यांच्या संख्येचा अंदाज घेता यावा, हा उद्देश होता. 
- प्रशांत तेंडुलकर,
वन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com