चांदोली राष्ट्रीय उद्यान पाहायचे आहे ?; मग हे जरूर वाचा...

शिवाजीराव चौगुले
Tuesday, 26 November 2019

पावसाळ्यामुळे चार महिने बंद केलेले उद्यान 15 ऑक्‍टोबरपासून पर्यटकांना खुले करण्यात आले आहे. मात्र ऑक्‍टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेल्या परतीच्या पावसाचा परिणाम पर्यटनावर झाला. त्यानंतर पर्यटनाला गती मिळाली आहे. 1 नोव्हेंबरपासून चांदोली धरण पाहण्यासाठी पासची सोय केल्याने पर्यटकांना चांदोली धरण व राष्ट्रीय उद्यान यांचा आनंद लुटता येऊ लागला आहे.  

शिराळा ( सांगली )  : चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे अंतरंग आता प्रवेशद्वारावर अवतरल्याने उद्यानात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना उद्यानातील अंतरंगाची उत्सुकता निर्माण होत आहे. शिराळा तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा चांदोली राष्ट्रीय उद्यान, चांदोली धरण, वसंत सागर जलाशय व पठारावर असणाऱ्या पवनचक्‍क्‍या, पावसाळ्यात कोसळणारे धबधबे यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो. निसर्गाची ही मुक्तहस्त उधळण ही आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अनेकजण आतुर असतात.

चांदोलीत प्रवेश केल्यानंतर मणदूर ते खुंदलापूर हा नागमोडी वळणाचा घाट रस्ता व त्याच्या आजूबाजूला असणारी हिरवीगर्द झाडे पर्यटकांना आकर्षित केल्या शिवाय रहात नाही.. उद्यानात गेल्यानंतर पर्यटकांना गवे, सांबर, रानडुक्कर, माकडे,वानर, विविध प्रकारची फुलपाखरे विविध झाडे, फुले, वनस्पती पाहावयास मिळतात.

असे आहे तिकीट शुल्क 

प्रौढ 30 व लहान मुले 15, मध्यम वाहन 150, जड वाहन 300, 
शैक्षणिक सहल मुलांना 10, प्रौढांच्या साठी 20, कॅमेरा लहान 50 व मोठा 100, गाईड फी 300 शुल्क आहे. खासगी प्रवासी वाहने 7 असून त्याचे 1500 रुपये भाडे आहे. पर्यटकांना जनीचा आंबा, लपनगृह, झोळंबी सडा, विठ्ठलाई मंदिर, करंबळीनाला, जोंधळवाडा ही प्रमुख ठिकाणे पाहता येतात.

 उद्यानातील प्राण्यांच्या प्रतिकृती

उद्यानात नेमके काय आहे याची प्रतिकृती वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या वारणावती येथील अभ्यागत कक्षात उभारण्यात आली आहे. गवा, शेखरू, वानर, सांबर, भेकर, बिबट्या, मोर, हरीण, कोल्हा, तरस, माकड, वाघ, चौशिंगा, रानडुक्कर, मलबारी धनेश पक्षी, विविध जातींचे फुलपाखरू व वनस्पती यांची माहिती सचित्र व प्रतिकृतीतून साकारलेली आहे.

पर्यटकांना उद्यानाची भुरळ

जाधववाडी येथील तपासणी नाक्‍यावर वन्यजीव विभागामार्फत आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. त्यावर वाघ, बिबट्या, गाव माकडं, सांबर, हरण, रानटी कुत्रे यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्यानात प्रवेश करतानाच पर्यटकांना या उद्यानाची भुरळ पडत आहे. जाधववाडी परिसरात असणारे चांदोली रिसॉर्टही पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहे. 

पासची सोय 
पावसाळ्यामुळे चार महिने बंद केलेले उद्यान 15 ऑक्‍टोबरपासून पर्यटकांना खुले करण्यात आले आहे. मात्र ऑक्‍टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेल्या परतीच्या पावसाचा परिणाम पर्यटनावर झाला. त्यानंतर पर्यटनाला गती मिळाली आहे. 1 नोव्हेंबरपासून चांदोली धरण पाहण्यासाठी पासची सोय केल्याने पर्यटकांना चांदोली धरण व राष्ट्रीय उद्यान यांचा आनंद लुटता येऊ लागला आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wildlife Mockup Design Set Up On Chandoli Dam Entrance