राष्ट्रवादीला रामराजेही देणार धक्का ? 

राष्ट्रवादीला रामराजेही देणार धक्का ? 

सातारा : शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर किंवा त्यांच्या गटाच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जिल्ह्यात जोर धरला आहे. त्यासाठी दिल्लीतून सूत्रे हालत असून, येत्या 15 दिवसांत याबाबतचा धक्‍का राष्ट्रवादीला बसणार असल्याचे बोलले जात आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये रामराजेंनी उदयनराजेंच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट करण्यासाठी बांधणी केली. परंतु, त्याला यश आले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन वर्षे लोणंद औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या वादातून दोघांत पुन्हा ठिगणी पडली. त्यातच सातारा पालिका निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंना अपयश आले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून उदयनराजेंविरोधात पुन्हा मोट बांधली गेली. त्यांना उमेदवारी मिळूच नये यासाठी नेटाने प्रयत्न झाले. परंतु, त्याची दखल पक्षनेतृत्वाने घेतली नाही. तेव्हापासून रामराजे व शिवेंद्रसिंहराजे नाराजच होते. त्यातच लोकसभा निवडणूक संपल्यावर उदयनराजेंनी पुन्हा दोघांवर टीकास्त्र सुरू केले. त्यामुळे जखम आणखी चिघळली गेली. त्यातून शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपची वाट धरली. आता रामराजेंच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. 
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांनी जिल्ह्याच्या नेतृत्वात रामराजेंना चढता हात दिला. मंत्री, पालकमंत्री ते विधान परिषद सदस्य अशी त्यांना स्वत:ला पदे दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही त्यांचाच वरचष्मा राहिला. परंतु, उदयनराजेंबरोबरचा वाद आणि सत्ता स्थानापासून दूर जात असलेली राष्ट्रवादी या दोन्ही गोष्टी रामराजेंच्या निर्णयावर प्रभाव पाडणाऱ्या ठरणार आहेत. सत्ता कोणात्याही पक्षाची असो, फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर यांना मंत्रिपद मिळाले आहे. अगदी अपक्ष निवडून आले तरी ते मंत्री झाले. आता ते राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषदेचे सभापतिपदावर आहेत. पण, विधान परिषदेतील बदललेले संख्याबळ लक्षात घेता त्यांचे सभापतिपद धोक्‍यात आहे. ते 2022 पर्यंत विधान परिषदेचे आमदार राहणार आहेत. पण, सभापतिपद टिकून राहावे, यासाठी त्यांना आताच हालचाल करावी लागणार आहे. त्यांचे विधान परिषद सभापतिपद हे शिवसेना-भाजपच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. 
त्यामुळे त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या निवडणुकीवेळी ते उशिरा आले. शरद पवार जिल्हा दौऱ्यावर असताना ते अनुपस्थित होते. त्यामुळे चर्चांचा जोर वाढला आहे. त्यांचा कल भाजपकडे असला तरी त्यांची चर्चा शिवसेनेसोबत सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण, रामराजेंसारखा विधान परिषदेचा सभापती भाजपमध्ये यावा, अशी इच्छा दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळे रामराजेंच्या भाजप प्रवेशासाठी दिल्लीतून सूत्रे हालणार आहेत. बदलती राजकीय गणिते पाहता, येत्या 15 दिवसांत याबाबतचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

चर्चा करणाऱ्यांनाच विचारा ः रामराजे 

माझ्या पक्षांतराबाबत चर्चा करणारांनाच विचारा. माझ्याबाबत असे काहीही चालले नाही. मी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. आपला गट व संजीवराजे नाईक-निंबाळकर जाणार का? या प्रश्‍नावर उत्तर देणे त्यांनी टाळले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com