चिल्हेवाडी धरणातून पारनेरला पिण्याचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

पारनेर तालुक्याची तहान भागेल एवढे पिण्याचे पाणी चिल्हेवाडी धरणातून आणण्यासाठी प्रयत्न करू. तसेच यासाठी आग्रही भूमिका राज्य सरकारपुढे मांडू, असे आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले

नगर : पारनेर तालुक्याची तहान भागेल एवढे पिण्याचे पाणी चिल्हेवाडी धरणातून आणण्यासाठी प्रयत्न करू. तसेच यासाठी आग्रही भूमिका राज्य सरकारपुढे मांडू, असे आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले.

चिल्हेवाडी धरणाचा पाणीसाठा वाढल्यास पारनेरला पाणी कसे व कशाच्या माध्यमातून देता येईल, यासंबंधी भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. कोरडे यांनी याचा कृती आराखडा हजारे यांना सादर करून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या चिल्हेवाडी धरणाची सविस्तर माहिती हजारे यांनी मागविली आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी या एक टीएमसी धरणातून जुन्नर तालुक्यातील २१ गावांपाठोपाठ पारनेर तालुक्यातील पठारी भागासह इतर गावांची तहान भागू शकते.

जनआंदोलन उभारण्यासाठी सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा : कोरडे

दुष्काळ आणि पारनेर हे समीकरण कायमचे झाले आहे. भविष्यकाळात पारनेर तालुक्याला शेतीसाठी सोडा; परंतु किमान पिण्यासाठी शाश्वत पाणी मिळाले पाहिजे, यासाठी चिल्हेवाडी धरण हे नवसंजीवनी ठरणार आहे. तालुक्यातील सर्वपक्षीयांनी या पाण्यासाठी जनआंदोलन उभे करून पाठिंबा द्यावा.

 

चिल्हेवाडी धरणातून पारनेर-जुन्नर हद्दीपर्यंतच्या बेल्हे-गुंजाळवाडीपर्यंत बंद पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी शासनाने शंभर कोटींवर निधी दिला आहे. गुंजाळवाडी येथील गावातून लिफ्टच्या साहाय्याने पिंपळगाव रोठा येथील पठारावर या धरणातून आणलेले पाणी सोडले, तर पारनेर तालुक्यातील कुठल्याही कोपऱ्यापर्यंत ही पाणी पोहोचू शकते.

 

Web Title: Will try to bring drinking water for Parner from Chilhewadi dam - Anna Hazare