उदयनराजे बालेकिल्ला शाबूत राखणार? 

प्रवीण जाधव
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली असताना उदयनराजे अद्याप शांत आहेत. मात्र, त्यांची दमदार एन्ट्री जिल्हा राष्ट्रवादीत चैतन्य आणू शकते, असे कार्यकर्त्यांना वाटते.

सातारा : शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या प्रभावाला शह देत बालेकिल्ला शाबूत राखायचा झाल्यास खासदार उदयनराजे भोसले यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे आजवर राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणात बॅकफुटवर ठेवले गेलेल्या उदयनराजेंवर पक्ष सावरण्याची जबाबदारी येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी मागील लोकसभा निवडणुकीपासून भाजपचे प्रयत्न सुरू होते. उदयनराजेंना आपल्याकडे घेण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले; परंतु उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. त्यामुळे सातारा लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे मनसुबे प्रत्यक्षात साधता आले नाहीत. उदयनराजे नाहीत, तर शिवेंद्रसिंहराजे, असा पवित्रा घेत भाजपने जाळे टाकले. त्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या गळाला लागले. त्यांच्या जाण्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नक्कीच उलथापालथ होणार आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक अशा सर्वच राजकीय संस्थांच्या राजकारणामध्ये त्यांची ताकद आहे. त्यामुळे या राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला तडा जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये या सर्व घडामोडी घडत असताना कोणत्याही राजकीय खेळ्या आखताना अग्रेसर असणारे जिल्हा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते रामराजे नाईक-निंबाळकर शांत आहेत. शिवेंद्रसिंहराजेंच्या भूमिकेला राष्ट्रवादी कसे प्रत्युत्तर देणार, हे अद्याप कोणताच नेता बोलत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शॉकमध्ये असल्यासारखी परिस्थिती आहे. पुढाकार घ्यायचा कोणी आणि भाजपच्या या खेळीला रोखणार कसे, तेवढी ताकद कुणाची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे आजवरचे राजकारण पाहिल्यास रामराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख भूमिकांभोवतीच फिरत राहिले आहे. जिल्ह्यातील कोणताही राजकीय निर्णय असू देत, कोणत्याची संस्थांचे पदाधिकारी ठरवायची वेळ असो, या दोघांच्या मतांवरच बरेच काही अवलंबून असायचे. त्यामागेच अन्य आमदार व पदाधिकारी जायचे. अगदी मनात नसतानाही जिल्ह्यातील आमदारांना उदयनराजेंविरोधात भूमिका घ्यायला त्यांनी भाग पाडल्याची परिस्थिती होती. या राजकारणात उदयनराजे तसे नेहमीच बॅकफुटवर ठेवले जायचे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडी असो किंवा जिल्हा बॅंकेच्या संघर्षाशिवाय त्यांच्या पारड्यात काही पडले नाही. मात्र, आता चित्र बदलले आहे. शिवेंद्रसिंहराजेंना रोखायला उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्याशिवाय दुसरा नेता राष्ट्रवादीकडे नाही. शिवेंद्रसिंहराजेंची ताकदही पूर्वीच्या सातारा मतदारसंघातील प्राबल्यावर आहे. म्हणजेच कऱ्हाड उत्तर व कोरेगाव मतदारसंघात गेलेल्या सातारा तालुक्‍यातील भागावर. या ठिकाणी उदयनराजेंचाही गट आहे. सातारा शहरात त्यांची सत्ता आहे. जावळीमध्येही त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्याच्या जोडीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वैयक्तीरित्या मानणाऱ्या गटाची, मतदारांची साथ मिळू शकते. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंना सातारा मतदारसंघातच रोखण्याचे व उर्वरित दोन मतदारसंघांतील प्रभाव कमी करण्याची किमया उदयनराजे साधू शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will UdayanRaje keep up the Baleakilla ?