विषारी दारूचा प्रवास शिरपूरपासून नगरपर्यंत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नगर - पांगरमल (ता. नगर) येथील आठ जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारूचा प्रवास शिरपूर (जि. धुळे) येथून जिल्हा रुग्णालयातील उपाहारगृहापर्यंत झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यात शिरपूर येथील अट्टल गुन्हेगाराचा समावेश असून, पोलिसपथक त्याच्या मागावर असल्याचे आज सांगण्यात आले.

नगर - पांगरमल (ता. नगर) येथील आठ जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारूचा प्रवास शिरपूर (जि. धुळे) येथून जिल्हा रुग्णालयातील उपाहारगृहापर्यंत झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यात शिरपूर येथील अट्टल गुन्हेगाराचा समावेश असून, पोलिसपथक त्याच्या मागावर असल्याचे आज सांगण्यात आले.

विषारी दारूच्या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत भीमराज आव्हाड, जितू गंभीर, जाकीर शेख, हमीद शेख, मोहन दुग्गल, संदीप दुग्गल, वैभव जाधव, भरत जोशी यांना अटक केली. उपचारानंतर बरा झालेला रावसाहेब आव्हाड याला काल (रविवारी) अटक करण्यात आली. भीमराज आव्हाडला अटक केल्यानंतर विषारी दारूचे बिंग फुटले. मोहन दुग्गल याच्या सांगण्यावरून पोलिस भरत जोशीपर्यंत पोचले.

जोशीने नोव्हेंबर २०१६मध्ये अल्कोहोलची दोन बॅरल शिरपूर येथून आणली होती. त्याला शिरपूर येथील दादा वाणी याने मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. 

जोशीकडून अल्कोहोल व रसायने घेऊन जितू गंभीर, जाकीर शेख, मोहन दुग्गल जिल्हा रुग्णालयाच्या उपाहारगृहात बनावट दारू तयार करीत आणि छुप्या मार्गाने ग्राहकांपर्यंत पोचवत होते. पोलिसांनी शिरपूर येथे दोन पथके पाठविली आहेत. या पथकाने तेथे एकाच्या घरावर छापा घालून काही रिकामी बॅरल ताब्यात घेतल्याचे समजते.

आरोपींनी बनविलेली दारू भरण्यासाठी वापरलेल्या बाटल्यांवर बॅच क्रमांक दिसत नाहीत. त्यामुळे आरोपींनी या बाटल्या भंगारातून खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

तीन आरोपींच्या कोठडीत वाढ
विषारी दारूच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या जितू गंभीर, जाकीर कादीर शेख व हमीद अली शेख यांची पोलिस कोठडी दोन दिवस वाढविण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला.

अटक केलेल्या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारपर्यंत (ता. २२) वाढविली आणि आरोपी भीमराज आव्हाड व रावसाहेब आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी दिली. यापूर्वी आरोपी जितू गंभीरविरुद्ध तीन आणि मोहन दुग्गल व जाकीर शेख यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल आहे. भरत जोशीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात बनावट दारूबाबतचा एक गुन्हा दाखल असल्याचेही समजते.

Web Title: wine poison journey shirpur to nagar