ब्रेनस्ट्रोकशी लढाई जिंकत तिने दिला बाळाला जन्म 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

कोल्हापूर : ब्रेनस्ट्रोकने उभी केलेली लढाई तिच्यातील मातृत्वाने जिंकली आणि आज एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही कहाणी आहे मुंबईतील एका महिलेची. गर्भात बाळाने अंकुर धरला आणि त्याच दरम्यान तिला ब्रेनस्ट्रोक झाला. त्याचे परिणाम सोसत तिने आपल्या मातृत्वाच्या ताकदीवर आणि वैद्यकीय आधारावर बाळाला जन्म दिला. 

कोल्हापूर : ब्रेनस्ट्रोकने उभी केलेली लढाई तिच्यातील मातृत्वाने जिंकली आणि आज एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही कहाणी आहे मुंबईतील एका महिलेची. गर्भात बाळाने अंकुर धरला आणि त्याच दरम्यान तिला ब्रेनस्ट्रोक झाला. त्याचे परिणाम सोसत तिने आपल्या मातृत्वाच्या ताकदीवर आणि वैद्यकीय आधारावर बाळाला जन्म दिला. 

उच्च रक्तदाबाने या महिलेच्या मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत गुठळ्या झाल्या होत्या. त्या परिस्थितीत प्रसूती म्हणजे बाळासह दोघांनाही धोका होता; पण पोटातल्या बाळासाठी या मातेने सलग नऊ महिने एक दिवसही न चुकता रक्त पातळ होण्यासाठी दोन इंजेक्‍शने घेतली व प्रसूती व्यवस्थित झाली. येथील पत्की हॉस्पिटलमध्ये एका मातेने जीवावरची कसरत करत आपली मातृत्वाची जबाबदारी पेलली. 

या काहीशा वेगळ्या प्रसूतीबद्दल डॉ. सतीश पत्की यांनी सांगितले की, मुंबईतील या महिलेला लग्नानंतर आठ वर्षे अपत्य नव्हते. येथे उपचारानंतर तिला गर्भ राहिला; पण उच्च रक्तदाबामुळे तिला ब्रेनस्ट्रोक झाला. या परिस्थितीत पोटात बाळ वाढत राहणे धोका होता. त्यासाठी दररोज दोन इंजेक्‍शने व इतर उपचारांचीच गरज होती. त्यासाठी ही महिला मुंबईहून कोल्हापुरात राहायला आली. पत्की हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू ठेवले. ही महिला ब्रेनस्ट्रोक अवस्थेतही सर्व उपचाराला प्रतिसाद देत गेली. 

मला बाळ हवंय हीच तीव्र इच्छा त्यामागे होती आणि अखेर तिची प्रसूती व्यवस्थित झाली. तिला मुलगा झाला. आता तिच्या ब्रेनस्ट्रोकवर पुढे उपचार सुरू राहतील; पण बाळ होण्याची तिची इच्छा पूर्ण झाल्याने ती अधिक अधिक पॉझिटीव्ह प्रतिसाद देईल. ब्रेनस्ट्रोकमधूनही ती उपचारानंतर बाहेर पडेल. 
चौकट 
यांनी केले उपचार 
बाळासाठी ब्रेनस्ट्रोक अवस्थेत नऊ महिने मुंबई सोडून कोल्हापुरात रहाणे, दररोज उपचार घेणे हे आव्हान होते. एक दिवस उपचार चुकला तरी त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्‍यता असताना हे एका मातेने घडवून दाखवले. डॉ. सतीश पत्की, डॉ. उज्ज्वला पत्की, डॉ. श्‍वेता पत्की व भूलतज्ज्ञ डॉ. श्रीस्वरुप कुलकर्णी यांनी हे आव्हानात्मक उपचार केले. 
 

Web Title: Winning the Battle of the Brainstroke, she gave birth to the baby