थंडी वाढलीय.. चला, गरजूंना देऊया मायेची ऊब! 

परशुराम कोकणे
रविवार, 2 डिसेंबर 2018

थंडीमध्ये गरजूंना गरम कपडे, ब्लॅकेंट देण्यासाठी सोलापूरकरांनी 9922758868 आणि 9272679797 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच शहरात कोणत्याही भागात गरजूंना गरम कपड्यांची आवश्‍यकता असेल तर कळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर : थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. थंडीमुळे निवारा नसलेल्या बेघर आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सामाजिक भूमिकेतून सोलापूरकरांनी गरजूंना ब्लॅंकेट्‌स आणि गरम कपडे देण्यासाठी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. 

सोलापुरातील काही सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांकडून गजूरंना मायेची ऊब देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होण्याची आवश्‍यकता आहे. सिद्धेश्‍वर मंदिर परिसर, रेल्वे स्थानक, एसटी बसस्थानकासह शहरात विविध मंदिरांजवळ तसेच झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या गरिबांना गरम कपड्यांची आवश्‍यकता आहे. 

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून यंदा 600 जणांना स्वेटर, मफलर, पांघरूण देण्यात आले. सामाजिक भूमिकेतून आम्ही लोकांकडून गरम कपड्यांचे संकलन करत आहोत. हिवाळा संपेपर्यंत ही मोहीम चालू ठेवणार असल्याचे संस्थापक-अध्यक्ष महेश कासट यांनी सांगितले. माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनीही दिवाळीनंतर रात्री फिरून गरिबांना गरम कपड्यांचे वाटप केले आहे. 

आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सोलापुरात विविध ठिकाणी फिरून गरजूंना उबदार कपडे, पांघरूण देत आहोत. या उपक्रमास समाजाच्या विविध स्तरावर छान प्रतिसाद मिळत आहे. - महेश कासट, संस्थापक, श्रीमंतयोगी प्रतिष्ठान

रस्त्यावर झोपणाऱ्या गरजूंना आम्ही स्वेटर, पांघरूण उपलब्ध करून देत आहोत. गेल्या आठवड्यात रात्री 11 ते तीन यावेळेत शहरात वेगवेगळ्या भागांत फिरून गरम कपडे वाटप करण्यात आले. - प्रेम भुगडे, सदस्य, माणुसकी फाउंडेशन

थंडीमध्ये गरजूंना गरम कपडे, ब्लॅकेंट देण्यासाठी सोलापूरकरांनी 9922758868 आणि 9272679797 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच शहरात कोणत्याही भागात गरजूंना गरम कपड्यांची आवश्‍यकता असेल तर कळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Winter has Started Let's give the help to Needy people