महाबळेश्‍वर: वेण्णा लेक परिसरात हिमकणांची दुलई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, येथील आजचे किमान तपमान 12.6 अंश डिग्री सेल्सिअस होते. मळेधारकांच्या अनुभवानुसार वेण्णा लेक परिसरात आज शून्य अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी तपमान असण्याची शक्‍यता आहे.

महाबळेश्वर - येथील वेण्णा लेक तलाव व लिंगमाळा परिसराने आज (रविवार) हिमकणांच्या दुलाई अनुभव घेतला. वेण्णा तलावातील जेटी, गाड्यांवरचे टप हिमकणांनी, तर लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशीच्या व अन्य फळ- पालेभाज्यांच्या बागा, तसेच स्मृतिवन परिसर हिमकणांमुळे सकाळी पांढराशुभ्र दिसत होता.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, येथील आजचे किमान तपमान 12.6 अंश डिग्री सेल्सिअस होते. मळेधारकांच्या अनुभवानुसार वेण्णा लेक परिसरात आज शून्य अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी तपमान असण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून पर्यटनस्थळ चांगलेच गारठून गेले होते. आज तर तापमापकातील पारा आणखीनच खाली गेल्याने सर्वत्र कोरडे हवामान होते. कडका व प्रचंड थंडीमुळे सर्वत्र हुडहुडी जाणवत होती.

वेण्णा तलाव व लिंगमळा परिसर भल्या पहाटेपासून प्रचंड कुडकुडला होता. लिंगमाळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशी व अन्य फळ- पालेभाज्यांच्या बागा, स्मृतिवन परिसरात मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठले होते. सकाळी-सकाळी परिसरातील निसर्ग, झाडेझुडपे हे आपला हिरवा रंग हरवून गेले होते. वेण्णा तलाव येथील नौकाविहारासाठी नौकेत चढ-उतार करण्यासाठी वापरण्यात येणारी जेटी, याच परिसरातील गाड्यांवरचे टप हिमकणांनी पांढरेशुभ्र दिसत होते. जमलेले हिमकण गोळा करण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. या वर्षीच्या हंगामात दहा डिसेंबरला हिमकण दिसले. मात्र, आज प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिमकण पाहावयास मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: winter in mahabaleshwar

फोटो गॅलरी