आदेश नसताना दिघंचीत पोलिसांकडून गाळे उध्वस्त; कारवाईची मागणी 

नागेश गायकवाड
Wednesday, 30 September 2020

पोलिसांनी न्यायालय किंवा प्रशासनाचा कोणताही आदेश नसताना आटपाडीतील काहींची मदत घेऊन जेसीबीच्या साह्याने उध्वस्त केलीत. त्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे माजी सैनिक रमेश मोरे आणि शहाजी मोरे यांनी केली आहे. 

आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी, जि .  सांगली) येथे माजी सैनिकाच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत असलेली पत्र्याची दुकाने पोलिसांनी न्यायालय किंवा प्रशासनाचा कोणताही आदेश नसताना आटपाडीतील काहींची मदत घेऊन जेसीबीच्या साह्याने उध्वस्त केलीत. त्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे माजी सैनिक रमेश मोरे आणि शहाजी मोरे यांनी केली आहे. 

दिघंची येथे आटपाडी पोलिसांनी न्यायालय वा प्रशासनाचा कोणताही आदेश नसताना माजी सैनिक रमेश मोरे आणि शहाजी मोरे यांची दुकाने पाडली आहेत. श्री. मोरे बंधूनी 1985 मध्ये आवडायचे जाधव यांच्याकडून ही जागा खरेदी केली होती. रमेश मोरे आणि शहाजी मोरे यांचे गट नंबर 1631 मध्ये पत्र्याचे शेडवजा गाळे होते. त्यात त्यांचे सिमेंटचे आणि इतर दुकान होते. आटपाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोते यांच्यासह अन्य तीन पोलिसांनी जेसीबी घेऊन येऊन दुकाने उध्वस्त केली आहेत. 

याबाबत त्यांना मोरे बंधूनी विचारणा केली असता दमदाटी केल्याचा आरोप केला आहे. लेखी आदेश दाखवले नाहीत. सदर जागेवर अतिक्रमण आहे किंवा दुसऱ्याच्या मालकीची जागा आहे याबाबत कोणताही आदेश पोलिसांकडे नव्हता. तसा आदेश नसतानाही आटपाडीतील काहीचे हित जोपासण्यासाठी गुंडांच्या मदतीने पोलिसांनी दिघंचीत कारवाई केली. ही दुकाने पूर्ण उध्वस्त करून मोठे नुकसान केले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तर तक्रारीची दखल घेत कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

मोरे बंधूनी थेट जिल्हा पोलीस प्रमुखांकडे धाव घेतली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. 

पडताळणी करून अतिक्रमण काढून जप्त केले
धीरज जाधव यांच्या जागेवर मोरे बंधूंनी अतिक्रमण करून बळकावल्याची तक्रार 26 सप्टेंबरला दाखल केली होती. त्याची पडताळणी करून हे अतिक्रमण काढून जप्त केले.
- शिवाजी भोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without order police demolished the shops; Demand for action