सांगलीत महिला डॉक्टरचा विनयभंग, दागिनेही काढून घेतले

सांगलीत महिला डॉक्टरचा विनयभंग, दागिनेही काढून घेतले

सांगली - शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरातील एका डॉक्‍टर महिलेला गरीबांवर उपचारासाठी ट्रस्ट काढू, असे सांगून तिच्याकडून दागिने काढून घेतले. शिवाय गेल्या चार वर्षांपासून तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याप्रकरणी मिरजेच्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमवारी रात्री उशीरा शहर पोलिसात नोंद केली आहे. 

यासीन मुश्रीफ, तबस्सूम मुश्रीफ (दोघेही, रा. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित डॉक्‍टर महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिलेचे खासगी रूग्णालय आहे. यातील संशयित यासीन आयुर्वेदीक औषधांचा विक्रेता आहे. औषध खरेदी-विक्रीतूनच पीडित महिला आणि यासीनची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. ओळख वाढल्यानंतर यासीन पीडित महिलेच्या रूग्णालयात सातत्याने येत होता. त्यावेळी तो पीडित महिलेशी अश्‍लील इशारे करत होता. मात्र पीडित महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. 

त्यानंतर काही दिवसांनी यासीन याने गरीब रूग्णांवर स्वस्तात उपचार करण्यासाठी आपण एक ट्रस्ट स्थापन करू असे पीडित महिलेला सांगितले. त्याची कल्पना चांगली असल्याने तिनेही त्याला मान्यता दिली. त्यानंतर ट्रस्ट स्थापनेसाठी लागणाऱ्या पैशांपोटी पीडित महिलेकडून त्याने दागिने काढून घेतले. दागिने घेऊनही त्याने ट्रस्ट स्थापन केला नाही. 

एक महिन्यांपूर्वी यासीन पीडित महिलेच्या रूग्णालयात गेला होता. त्यावेळी त्याने तिचा हात धरून तिच्याशी गैरवर्तन केले. त्यावेळी पीडित महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. याबाबत पीडित महिलेने यासीनची पत्नी तबस्सूमला सांगितले होते. मात्र तिने पतीचीच पाठराखण केली. मुश्रीफ पती-पत्नीनी संगनमताने गैरवर्तन करून दागिने काढून घेतल्याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुश्रीफ दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com