महिला, युवतींसाठी दोन दिवसांचा समरकॅंप

Sakal-Madhurangan
Sakal-Madhurangan

सातारा - उन्हाळी सुटी म्हटले की सारेजण कोठेतरी थोडा विरंगुळा म्हणून छोटीशी का होईना सहल काढण्याचा विचार बहुतेक महिला करतात. त्यांच्या या विचाराला मूर्तस्वरुप देण्यासाठी ‘सकाळ मधुरांगण’ आणि सिनर्जी नॅचरल स्कूलच्या वतीने मधुरांगण सदस्या आणि त्यांच्या कुटुंबातील युवती, महिलांसाठी दोन दिवसांच्या समरकॅंपचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरापासून जवळच दोन दिवस मैत्रिणींच्या मेळ्यात ट्रेकिंगसह, योगा, झुंबा, कला आणि खेळांचा आनंद महिलांना लुटता येणार आहे.

एकदा संसारात गुरफटले की कुटुंब, मुलेबाळे अन्‌ दररोजचे धकाधकीचे जीवन सुरू होते. यामुळे परीक्षा संपली की कोठे तरी विरंगुळ्यासाठी गावाला जाणे, सहलीस जाणे, मैत्रिणींच्यासमवेत गप्पागोष्टी करत फिरणे हे सारे बाजूला पडते. बहुतेक महिला या आनंदाला पारख्या होतात. त्यांनाही कोठे सहलीस जावे, शिबिरात सहभागी व्हावे असे वाटत असते. हे त्यांना शक्‍य व्हावे यासाठी या समरकॅंपचे आयोजन करण्यात आले आहे.  

हा समरकॅंप साताऱ्यानजीक जुन्या औद्योगिक वसाहतीतील सिनर्जी नॅचरल स्कूलच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार (ता. १९) आणि शनिवार (ता. २०) असे दोन दिवस हा निवासी कॅंप आहे. या कॅंपमध्ये महिलांकरिता निवास आणि भोजनाची दर्जेदार सोय असणार आहे.

त्याबरोबरच योगासनांचे तज्ज्ञ योगा शिक्षकांतर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे. व्हीपीज झुंबा ॲकॅडमीच्या वैशाली पाटील झुंबाचे प्रशिक्षण देणार आहेत. तर कलात्मक रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण टियारा ब्युटी पार्लरच्या संगीता नांगरे देणार आहेत. याबरोबरच महिलांना निसर्गात भ्रमंती करता यावी, यासाठी पाटेश्‍वर येथे ट्रेकिंग आयोजित केले आहे. त्यावेळी ड्रीम टुर्सचे शैलेश करंदीकर निसर्गातील अनवट वाटा दाखविणार आहेत. 

त्याशिवाय मैदानी खेळ, इतर गमतीदार खेळ, गप्पागोष्टी यामध्ये महिलांना रमता येणार आहे. महिलांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच या वेळी महिलांना आतरराष्ट्रीय दर्जाचा कलात्मक चित्रपटही दाखविला जाणार आहे. सदस्या आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांनी आवर्जून या संधीचा लाभ घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com