स्त्री रुग्णालय कार्यान्वित होण्याची गरज

सिव्हिल हॉस्पिटल सातारा
सिव्हिल हॉस्पिटल सातारा

सातारा - जिल्हा रुग्णालयाच्या स्थापनेपासून रुग्णसंख्येच्या मर्यादेत वाढ न झाल्याने आंतर व बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालय तातडीने कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे.

खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग असो वा आंतररुग्ण या ठिकाणी उपचाराचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग तसेच आंतररुग्ण विभाग हा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. दररोज सुमारे हजारभर लोक बाह्यरुग्ण विभागात विविध आजारांच्या उपचारासाठी येत असतात. त्याचबरोबर आंतररुग्ण विभागातही मोठ्या संख्येने रुग्ण दाखल करण्याची आवश्‍यकता असते.

जिल्हा रुग्णालयाच्या स्थापनेपासून २५० बेडची क्षमता आहे. परंतु, जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ती गृहित धरून जिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत.  
मंजूर खाटांच्या संख्येनुसारच जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व अन्य पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध संख्याबळालाच वाढलेल्या रुग्णसंख्येला पाहावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालयातील आंतर व बाह्यरुग्ण विभागातील कारभाराचा बट्टयाबोळ होत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत आहे. बाह्यरुग्ण विभागात तर दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण भेट देत असतात. परंतु, त्या तुलनेत ओपीडी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या नसल्याने रुग्णांच्या रांगाच्या-रांगा वाट पाहात उभ्या असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या रुग्णाला ओपीडीच्या वेळेत वैद्यकीय अधिकाऱ्याला दाखवणे, तपासण्या करणे व नंतर औषधे घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात बाह्यरुग्ण विभागाची रचना करणे आवश्‍यक आहे.

बाह्यरुग्ण विभागाप्रमाणेच आंतररुग्ण विभागातही रुग्णांना विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मंजूर बेडच्या संख्येपेक्षाही कितीतरी जास्त रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागत आहे.

त्यामुळे या रुग्णांना बेडऐवजी जमिनीवर गाद्या टाकून झोपवावे लागत आहे. त्यामुळे वॉर्डच्या रचनेच्या शासकीय नियमावलीची पायमल्ली जिल्हा रुग्णालयातच नाईलाजास्तव करावी लागत आहे. त्याचबरोबर औषध व अन्य सर्जिकल उपकरणे बेडच्या संख्येनुसारच उपलब्ध होतात. त्यामुळे रुग्णांना अनेकदा ती बाहेरून विकत आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची मर्यादा वाढविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी स्त्री रुग्णालयाचे काम तातडीने मार्गी लावणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com