मूल होत नसल्याने उपचारासाठी गेलेल्या माहिलेची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

मोठ्या रॅकेटची शक्‍यता 
दीपाली माने यांना औषधे देणारा डॉक्‍टर नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. जेथून त्यांनी औषधे घेतली, ते आयुर्वेदिक औषधे विकणाऱ्या साखळी समूहातील एका कंपनीचे मेडिकल असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणाचा योग्य तपास बेंबळी पोलिसांकडून झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर - लग्नानंतर मूल होत नसल्याने महिलेने अनोळखी डॉक्‍टराकडून उपचार घेतले. त्या डॉक्‍टरने मूल होण्यासाठी बनावट औषधे दिली. काही औषधे स्वत:कडील दिली तर काही औषधे सोलापुरातील मेडिकलमधून घेण्यास सांगितली. या प्रकरणात महिलेची एक लाख ७१ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी डॉक्‍टरवर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा बेंबळी (जि. उस्मानाबाद) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

दीपाली अमोल माने (वय ३०, रा. बामणी, जि. उस्मानाबाद) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून ते २७ सप्टेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली आहे. लग्नानंतर दीपाली माने यांना मूल होत नव्हते. या समस्येवर एक आयुर्वेदिक डॉक्‍टर उपचार करतो असे त्यांना तूप विकणाऱ्या महिलेकडून कळाले. त्यानुसार माने यांनी त्या डॉक्‍टरशी संपर्क केला. तो डॉक्‍टर दीपाली माने यांच्या बामणी (जि. उस्मानाबाद) येथील घरी गेला.

उपचाराच्या नावाखाली तो बनावट औषधे देत होता. या बदल्यात त्याने एक लाख ११ हजार रुपये घेतले आहेत. तसेच काही औषधे सोलापुरातील शिवाजी चौकातील विश्‍वरत्न मेडिकल या ठिकाणाहून घेण्यास सांगितले. मेडिकल चालक काकासाहेब मनोहर गोसावी याने औषध बनवून ठेवतो म्हणून पैसे घेतले. दुसऱ्या दिवशी गेल्यावर तुम्ही काल आलाच नव्हता असे म्हणून टाळाटाळ केली. डॉक्‍टरने एकूण एक लाख ७१ हजार रुपये घेऊन माने यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलिसांनी हा गुन्हा बेंबळी पोलिस ठाणे (जि. उस्मानाबाद) यांच्याकडे वर्ग केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Child Treatment Cheating Crime