महिलांकडून दारूअड्डा उद्‌ध्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला. गावालगतच्या मिरज- भिगवण राज्यमार्गावरील धोंडेवाडी हद्दीतील दोन ढाबे व दातेवाडीतील दारूअड्ड्यांवरही धाड टाकली. मात्र, धाडीची आधीच चाहुल लागल्याने तेथे हाती काहीच लागले नाही.

मायणी - धोंडेवाडी (ता. खटाव) येथील रणरागिणींनी दारूविक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटत पोलिसांच्या सहकार्याने गावातील दारूचा अड्डा उद्‌ध्वस्त केला. गावालगतच्या मिरज- भिगवण राज्यमार्गावरील धोंडेवाडी हद्दीतील दोन ढाबे व दातेवाडीतील दारूअड्ड्यांवरही धाड टाकली. मात्र, धाडीची आधीच चाहुल लागल्याने तेथे हाती काहीच लागले नाही.

येथे दारूविक्री बंद करण्याची मागणी करूनही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे महिलांमध्ये संताप वाढत चालला होता. अखेर रणरागिणींनी दारूविक्रीचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याचा चंग बांधला. पोलिसांना बोलावून घेतले. संगीता घाडगे, रंजना घाडगे, स्मिता शेळके आदी महिलांसह तरुणांचा गट पोलिसांसमवेत दारूअड्ड्यांकडे गेला. तेथे पोचताच दारूविक्रेत्या निवृत्ती घाडगे यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पळून जाता आले नाही. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा दारूविक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. तोवर भिंतीच्या आडोशाला ठेवलेली 

देशी दारूची खोकी महिलांनी घराबाहेर आणून टाकली. तेथेच उपलब्ध असलेल्या काठ्यांनी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. घाडगे यांच्या घराशेजारी दारूच्या शेकडो रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेलाही महिलांनी पाहिला.  दारूच्या बाटल्या फोडल्यानंतर त्यांनी गावालगतच्या मिरज-भिगवण राज्यामार्गावरील ढाब्याकडे मोर्चा वळवला. तेथील दोन्ही ढाब्यांवर बेकायदा देशी दारूची विक्री होत असल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले. मात्र, तेथे टाकलेल्या धाडीत काहीही हाती लागले नाही. त्यानंतर गावाच्या पूर्वेकडील दातेवाडीतील दारूअड्ड्यावरही धाड टाकण्यात आली. तेथूनही महिलांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.

पोलिसांकडून दारूविक्रेता ताब्यात 
दरम्यान, पोलिसांनी दारूविक्रेता निवृत्ती घाडगे यास ताब्यात घेतले. मायणी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी विकास जाधव, प्रकाश कोळी, नवनाथ शिरतोडे यांनी सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. 

Web Title: women destroyed the liquor shop in khatav