उसवलेल्या आयुष्याला 'ती' घालतेय जिद्दीने टाके

women fight against poverty
women fight against poverty

पंढरपूर - कसला सण आणि कसलं काय, सण करत बसले तर पोट भरणार कसं, आपली अडचण कोणी दूर करू शकत नाही, आपले आपल्यालाच निस्तरावे लागते, अशा उद्विग्न भावना येथील दिव्यांग राजश्री परशुराम वाघमारे यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या. शारीरिक अपंगत्वासमोर हार न मानता त्या आपल्या उसवलेल्या आयुष्याला जिद्दीने टाके घालण्याचे काम करत आहेत.

राजश्री वाघमारे यांचे दोन्ही हात जन्मजात अंतरवक्र आहेत. अपंग असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे. अपंग असूनही हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत त्या आयुष्याची लढाई मोठ्या जिद्दीने लढत आहेत. मक्रर संक्रांत सणानिमित्त अपंग राजश्री यांच्याशी "सकाळ'ने संवाद साधला.

येथील संत गजानन महाराज मठ ते विवेक विर्धिनी विद्यालय या दरम्यानच्या रस्त्याकडेला राजश्री वाघमारे पादत्राणे दुुरुस्तीचे काम करत बसतात. त्यांचे वडील तुकाराम हे अर्बन बॅंकेजवळ पादत्राणे शिवण्याचे करत बसत. तुकाराम यांना तीन मुली आणि दोन मुले होती. परिस्थिती हलाखीची. त्यामुळे मुलामुलींना शिकवणे अवघड झालेले. तशाही परिस्थितीत राजश्री या सखुबाई कन्या प्रशालेत आठवीपर्यंत शिकल्या. पुढे शिकण्याची इच्छा असतानाही त्यांना शाळा सोडावी लागली. वडिलांच्या शेजारी बसून राजश्री यांनी पादत्राणे शिवण्याचे काम शिकून घेतले आणि तेच आज त्यांचे जगण्याचे साधन झाले आहे.

वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर राजश्री यांचे लग्न झाले. राजश्री यांचे पतीही चांभार काम करत तर राजश्री या दवाखान्यात झाडलोट करून चार पैसे मिळवत. दुर्दैवाने राजश्री यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले आणि एका लहान मुलीसह जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. राहण्यास घर ना दार. दवाखान्यात झाडलोट करून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर उदरनिर्वाह करणे त्यांना अशक्‍य झाल्याने राजश्री यांनी चांभार काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर त्या चांभार काम करतात. कधी पोटापुरते पैसे मिळतात तर कधी मिळत नाहीत.

जन्म अन्‌ जातीच्या दाखल्यात अडकले घरकुल
राजश्री यांनी त्यांना मिळणाऱ्या थोडक्‍या पैशातून काही पैसे साठवून भक्तीमार्गावरील मोकळ्या जागेत चार पत्र्यांत संसार उभा केला आहे. त्या आणि त्यांची मुलगी तिथे राहतात. मुलीला शिकवणे त्यांना अवघड होत आहे. राहण्यासाठी घरकुल मिळावे यासाठी अनेकदा त्यांनी नगरपालिकेत हेलपाटे मारले, परंतु जन्माचा आणि जातीचा दाखला नसल्याने त्यांना अद्याप घरकुल मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्या हताश झाल्या आहेत. कोणीही आपल्याला मदत करत नाही. सर्व जग स्वार्थी आहे अशी त्यांची भावना झाली आहे. राजश्री यांना आपल्या हक्काचे घरकुल मिळावे, त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी सामाजिक संस्थांनी अथवा दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com