मांढरदेव घाटात महिलेचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

वाई - मांढरदेव घाटात 24 वर्षे वयाच्या एका अज्ञात महिलेचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला. गुंडेवाडी गावाच्या वरील बाजूस माळवाठार शिवारातील ओघळीत दुपारी बाराच्या सुमारास हा मृतदेह आढळला. पोलिसांनी सांगितले, की पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी गाढवेवाडी येथील कामगार डोंगरात गेला होता. त्याला हा मृतदेह दिसला. त्याने वाई पोलिसांना कळविले.

पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक बबन येडगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेच्या डाव्या हातावर मेंदीने बानू-मोहंमद असे इंग्रजीमध्ये लिहिले आहे. करंगळीवर बानू लिहिले आहे. तिच्या अंगावर गुलाबी रंगाचा टॉप असून त्यावर निळ्या फुलांचे नक्षीकाम आहे. पायात पैंजण आणि जोडवी आहेत. उजव्या हाताच्या बोटात खड्याची अंगठी आहे. पोलिसांनी हाताचा ठसा घेऊन आधार कार्ड सुविधेद्वारे तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. पोलिस निरीक्षक विनायक वेताळ तपास करीत आहेत.

Web Title: women murder in mandhardev ghat