सर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील असलेल्या इको फ्रेंडली क्‍लबच्यावतीने दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा सन्मान सर्वोच्च शिखरावर या संकल्पनेवर आधारित ट्रेक आयोजित केला होता. सोलापूरसह पुणे, औरंगाबाद, ठाणे, उस्मानाबाद, बीड, नगर, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर येथील महिला सदस्यांनी ट्रेकमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.

सोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी, प्राध्यापिका, शिक्षीका यासह विविध क्षेत्रातील शंभराहून अधिक मान्यवर महिला सदस्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करून स्त्रीशक्तीचा जयघोष केला. 

पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील असलेल्या इको फ्रेंडली क्‍लबच्यावतीने दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा सन्मान सर्वोच्च शिखरावर या संकल्पनेवर आधारित ट्रेक आयोजित केला होता. सोलापूरसह पुणे, औरंगाबाद, ठाणे, उस्मानाबाद, बीड, नगर, अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर येथील महिला सदस्यांनी ट्रेकमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. पहिल्या दिवशी भंडारदरा परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहून सारेच उत्साहीत झाले. अमृतेश्वर मंदिराच्या दर्शनानंतर सांदण दरीमध्ये ट्रेक करताना साऱ्यांनी निसर्गाची नवलाई अनुभवली. 

दुसऱ्या दिवशी पांजरे गावातून जंगलवाटेने सर्व निसर्गप्रेमी कळसुबाईच्या शिखरावर पोचले. एव्हरेस्टवीर प्रा. मनीषा वाघमारे यांना इको फ्रेंडली क्‍लबच्यावतीने सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता हत्ती, वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्नेहल गणेशकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रा. वाघमारे यांनी आपले गिर्यारोहणाचे अनुभव सर्वांशी शेअर केले. अर्चना पोरे यांनी महाराष्ट्रगीत सादर केले. प्रेषिता चपळगावकर यांनी हम होंगे कामयाब.. हे गाणं सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. कळसुबाई शिखरावर सर्वात आधी पोचल्याबद्दल सृष्टी गडदे हिचा आणि ज्येष्ठ सदस्या छाया निकते यांचा सत्कार करण्यात आला. शंभराहून अधिक महिला सदस्यांनी साहसी पर्यटन केल्याबद्दल पर्यटकशास्त्राच्या अभ्यासिका प्रा. मेघा शिर्के यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 

ट्रेकचे आयोजन पर्यावरणप्रेमी तथा इको फ्रेंडली क्‍लबचे संस्थापक परशुराम कोकणे, कार्याध्यक्ष भाऊराव भोसले यांनी केले होते. समन्वयक सरस्वती कोकणे, स्वाती भोसले, दिप्ती इंगळे, देवदत्त सिध्दम, महेंद्र राजे, सिद्धाराम बिराजदार, यशराज कोकाटे, अभिषेक दुलंगे यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या ट्रेकमध्ये सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, नितीन पवार, लेखाधिकारी जगन्नाथ राऊत, शिक्षक बी. एस. काळे, ऍड. शर्मिला देशमुख, ऍड. अंजली बाबरे, वनपाल शीला बडे, डॉ. प्रतिभा टेकाडे, प्रा. सुचिता देशमुख, प्रा. नेहा चव्हाण, शिक्षिका अंजली शेंडगे, अश्विनी मोरे, वंदना आळंगे, संगीता रेळेकर, विद्या अक्कलकोटे, दुर्गा थिटे, मुग्धा दाते, आयेशा शेख, रसिका संत, विजया सज्जन, मनीषा वासकर, सुरेखा नवघरे यांच्यासह मान्यवर महिला सदस्या कुटुंबासह सहभागी झाल्या होत्या.

Web Title: womens climb kalsubai peak