
उंबऱ्याच्या बाहेर पडून महिला हरेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखवत आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार, संरक्षण, कोणत्याही क्षेत्रात ती मागे नाही.
Womens Day Special : ‘ती’ ड्रायव्हिंग सीटवर...
उंबऱ्याच्या बाहेर पडून महिला हरेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखवत आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार, संरक्षण, कोणत्याही क्षेत्रात ती मागे नाही. ती आत्मविश्वासाने, जिद्दीने, चिकाटीने एकेक क्षेत्रात आपला जम बसवते आहे. वाहनाचे सारथ्य करणे, हे तसे आव्हानात्मक काम. तेही तिने लीलया पेलले आहे. पुरुषांच्या तुलनेत तिच्या हाती ‘स्टेअरिंग’ अधिक सुरक्षित आहे. आज जागतिक महिला दिन. त्यानिमित्ताने ड्रायव्हिंग सीटवरील महिलांविषयी...
तीन हजार महिलांना शिकवली चारचाकी
‘महालक्ष्मी मोटार ड्रायव्हिंग स्कूल’ हा फलक लावलेले एक चारचाकी वाहन सांगलीतून फिरताना दिसते. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या बाईला सीमरन पवार वाहन चालवायला शिकवत असतात. तिच्यात धाडस, आत्मविश्वास भरत असतात. गेल्या १७ वर्षात त्यांनी तीन हजार महिलांना प्रशिक्षण दिले. हा प्रवास अखंड सुरू आहे. सीमरन मूळच्या धाराशिवच्या. वडील रंगराव शिंदे यांनी कार चालवायला शिकवले. लग्नानंतर २००६ मध्ये सांगलीतील गरज ओळखून चारचाकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार मांडला. पती रणजित, सासरे तानाजी, सासूबाई सुमन यांनी पाठबळ दिले. सीमरन सांगतात, ‘‘महिला या पुरुषांपेक्षा सुरक्षित वाहन चालवतात. कारण त्या मवाळ, भावूक असतात. त्या घाई करत नाहीत, त्यांना रॅश ड्रायव्हिंग येत नाही. माझ्याकडे शिकलेली महिला महापालिकेत घंटागाडीवर चालक झाली, एक विद्यार्थी वाहतूक करतेय, तर आमचा अभिमान असलेली कल्याण बावडेकर आरटीओ आहे. वाहन चालवणे हौस असतेच; मात्र ठरवले तर तो रोजीरोटीचा व्यवसाय होऊ शकतो. कित्येक महिला ते आत्मविश्वासाने करताहेत आणि त्यात मी त्यांच्या सोबत आहे.’
एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज
परिवहन महामंडळाच्या सांगली विभागात ११ महिला ड्रायव्हरचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यात साखराळे ( ता. वाळवा) येथील सीमा लोहार यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये त्यांनी अवजड प्रवासी वाहतुकीचा परवाना घेतला. त्यानंतर काही दिवसांतच एसटी महामंडळाकडे अर्ज केला. त्या म्हणाल्या, ‘‘महामंडळाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सध्या एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अंतिम चाचणीतील ८० दिवसांतील ५० दिवस पूर्ण झाले आहेत. येत्या ३० दिवसांनंतर प्रवाशांसाठी ड्रायव्हर म्हणून सेवेस सुरवात होईल. महिला चालक झाल्याचा मला मोठा आनंद होत आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हेच यातून सिद्ध होत आहे.’
निर्भया पथकाची जबाबदारी
‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय...’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. अगदी त्याच पद्धतीने पोलिस अंमलदार वर्षाराणी चव्हाण आणि पोलिस नाईक वैशाली माने या दोघींसह पाच महिला चालक निर्भया पथकाची जबाबदारी सांभाळत आहेत. वैशाली यांनी २०१७, तर वर्षाराणी यांनी २०१६ मध्ये पुण्यात चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सांगलीत त्या निर्भया पथकाच्या गस्तीपथकाच्या गाडीवर कार्यरत आहेत. महाविद्यालयासह महिलांची छेडछाड रोखण्यासाठी हे पथक तत्पर असते. त्याचे सारथ्य या महिला करताहेत. पथकास कॉल आल्यानंतर क्षणात ही गाडी घटनास्थळी पोहोचते. येणाऱ्या काळात मंत्र्यांच्या ताफ्याचे सारथ्य करण्याची इच्छा असल्याचे दोघींनी सांगितले.
कोकण विभागात पहिली महिला एसटी बस चालकाचा मान
राज्य परिवहन मंडळाच्या कोकण विभागात पहिली महिला चालक होण्याचा मान देवरुख (जि. रत्नागिरी) येथील श्रीमती स्वप्नाली शंकर सुवरे यांना मिळाला आहे. रेल्वे, विमान चालवण्यात महिला आघाडीवर आहेत. एसटी चालवण्यातही महिला आता पुढाकार घेत आहेत. महामंडळात २०१३-१४ पासूनच वाहक म्हणून महिला सेवेत दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे नव्याने एसटीत चालक म्हणून दाखल होणाऱ्या महिलांना चालकासह वाहक म्हणूनही सेवा बजावण्याची संधी दिली जाणार आहे. त्या म्हणाल्या, ‘‘चालक म्हणून माझी अंतिम निवड झालेली असून लवकरच प्रशिक्षण संपल्यानंतर नियमित सेवेत दाखल होत असल्याचा मोठा आनंद आहे.’’
रुग्णसेवेसाठी स्वीकारले व्रत
रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग स्वतःच्या हाती घेऊन रुग्णसेवेचे व्रत त्यांनी घेतले आहे. सांगलीतील काजल कांबळे त्यांचे नाव. लहानपणापासून रुग्णसेवा करण्याचा संकल्प काजल यांनी केला होता. त्यांच्या बंधूंची रुग्णवाहिका आहे. त्यांच्याकडून होणारी रुग्णसेवा त्यांनी नेहमीच पाहिली आहे. म्हणूनच जिद्दीच्या जोरावर त्या रुग्णवाहिका चालवण्यास शिकल्या. अडचणीच्या काळात काजल या स्वत: रुग्णवाहिका घेऊन रुग्णसेवा देतात. स्वतःचे काम सांभाळून त्या समाजाचे देणं म्हणून त्या या सेवेत कार्यरत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळवण्यासाठी एक महिला रुग्णवाहिका चालवते, याचे कौतुक सर्वत्र होते आहे.