आश्‍चर्य...येथे गावठी कुत्रे धावले मॅरेथॉनमध्ये

dog.jpg
dog.jpg

सांगली- सातारा ते सांगली अशी धाव घेत शहीद मॅरेथॉनसाठी आलेल्या टीममध्ये यावेळी चक्क एक कुत्रा आला होता. हा काही पाळीव कुत्रा नव्हे. रस्त्यावरचा भटका कुत्रा का कोणास ठावूक धावपटूंसोबत सांगलीपर्यंत आला आणि सर्व सांगलीकरांच्या गळ्यातील ताईत बनला. सर्वांनी त्याचं नाव अल्ट्रा ठेवलं. सध्या तो दोन दिवस सांगलीतच विश्रांतीसाठी मुक्कामाला असून नंतर त्याचा मुक्काम सांगली की सातारा याचा निर्णय होणार आहे. 


साताऱ्याच्या हिल मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात सहभागी असणारे बांधकाम व्यावसायिक निरंजन पिसे हे गेली तीन वर्षे सातारा ते सांगली धावतात. यंदाही ते साताऱ्यातील शिवतीर्थावरून शुक्रवारी पहाटे दौडीसाठी निघाले. त्यांच्यासोबत कऱ्हाड-मलकापूरचे कर्मचारी मारुती चाळके होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे व सहकारी दोघांसोबत किमान 10 किलोमीटर धावणार होते.

ते धावायला लागले आणि मध्येच एक भटकं कुत्रं घुसलं. सर्वांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र ते हटेना. शेवटी सर्वांनी त्यांना धावू दे असे म्हणत दुर्लक्ष केलं. 
एरवी गाडीमागून धावणारी कुत्री किती वेळ धावतात सर्वांना माहीत आहेच. हे कुत्रं मात्र इरसाल निघालं. ते हायवेपर्यंत धावत आलं. मग त्याचं कौतुक सुरू झालं. त्याचे फोटोसेशन सुरू झाले. दुपार झाली तरी ते धावतच होतं. 40 किलोमीटरचा टप्पा ओलांडल्यावर निरंजन यांनी त्याची धाव फेसबूक लाईव्ह केली आणि मगर सर्वांच्या लाईक सुरू झाल्या.

एक अनोळखी, गावठी कुत्रा इतकं सलगपणे धावतोय हा प्रकारच आचंबित करणारा. नेटीझन्सच्या कौतुकाच्या उड्या पडू लागल्या. रात्री हॉटेलमध्ये निरंजन आणि मारुती यांनी त्याला आपल्यासोबत मुक्कामाला घेतलं. 
एका रात्रीत तो जगभरातल्या रनर्स कम्युनिटीचा हिरो झाला होता. धावपटुंप्रमाणेच तो अंगावर पाणी ओतून अंग थंड करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी धावताना आजूबाजूच्या शेतात पाटाचं पाणी वाहताना दिसलं की तो त्यात डुबकी मारायचा. दिवसभर तब्बल 85 किलोमीटरचा अंतरावर त्याचा जागोजागी हा प्रकार सुरू होता. त्याला पळताना होणारे त्रास वेगळेच. प्रचंड वेगाने धावणारी वाहने आणि रस्त्यावरील जागोजागीची कुत्री त्याला त्रास द्यायची. मात्र हा मात्र सर्वांकडे दुर्लक्ष करीत आपल्या चालीने पळायचा.

इस्लामपुरातून पहाटे पुन्हा निरंजन यांची आवराआवर सुरू झाली तर हा पठ्ठया पुन्हा जागा झाला. आवराआवरी झाली निरंजनसोबत आलेल्या कारमध्ये सगळं भरलं आणि दौड सुरू केली तसं या कुत्र्याचंही धावणं सुरू झालं. शनिवारी पहाटे ते सांगलीत पोहोचले आणि सर्वांच्या कौतुकाचा तो कुत्रा विषय झाला. मॅरेथॉनच्या दुनियेत जे लांब-लांब अंतर धावतात त्यांना "अल्ट्रा रनर्स' म्हणतात. त्यामुळे सर्वांनी त्याचे "अल्ट्रा' नाव निश्‍चित केलं. निरंजन यांनी सातारला जाण्याआधी या अल्ट्राला सांगलीतच आपली बहीण लता यांच्याकडे मुक्कामाला ठेवलं आहे. 


""तासी आठ-दहा किलोमीटर वेगाने तो धावल्याचे दिसते. मात्र तरीही एवढी मोठी धाव गावठी कुत्र्याने केल्याचे ऐकिवात नाही. तो कौतुकास नक्कीच पात्र आहे. ते कसे घडले याबद्दल आश्‍चर्यच'' 
अजित काशीद 
श्‍वान अभ्यासक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com