राजे, अजून आमच्या बोटावरची शाई सुकली नाही ! भाजप प्रवेशावरुन मतदारांची चर्चा

प्रवीण जाधव
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

खुद्द उदयनराजेंनी अद्याप ठामपणे भाजपमध्ये जाणारच, असे जाहीर केलेले नाही; परंतु त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जिल्ह्यातील त्यांना मतदान केलेल्यांच्या हृदयात कालवाकालव सुरू झाली आहे.

सातारा : संपूर्ण देशात मोदी लाटेची जोरदार हवा असतानाही क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला. परंतु, त्यानंतर अवघ्या काही दिवसांत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतल्याने या पाठीराख्यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली आहे. "राजे, अजून आमच्या बोटावरची शाई सुकली नाही,' अशा प्रतिक्रिया मतदारांच्या मनात उमटू लागल्या आहेत. अर्थातच उदयनराजेंनी भाजप प्रवेशाबाबत आपली कोणतीच भूमिका जाहीर केलेली नसली, तरी जिल्ह्यात त्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. 
2014 असो किंवा 2019 संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा करिष्मा पाहायला मिळाला. या लाटेमध्ये अनेक मोठ्या नेत्यांचे पारंपरिक गड ढासळले गेले. मोदी लाटेच्या या हवेवर स्वार होत सातारा जिल्ह्यातही युतीचा झेंडा नाचविण्याची तयारी केली गेली होती. सुरवातीला उदयनराजेंनाच पक्षात घेण्याचे डावपेच भाजपकडून आखले गेले; परंतु त्यांनी राष्ट्रवादीत राहणे पसंत केले. उदयनराजेंना असलेला पक्षांतर विरोध क्षमवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. त्यानंतर उदयनराजेंना कोणत्याही परिस्थितीत पराभव पत्करायला लावायचा, असा चंग भाजपच्या धुरिणांनी आखला. युतीच्या जागावाटपात साताऱ्याची जागा शिवसेनेकडे गेली. तरीही भाजप थांबले नाही. आपल्या पक्षातील माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत प्रवेश करायला लावून उदयनराजेंच्या विरोधात उमेदवारी मिळवून दिली. 
उमेदवारी मिळवून देण्यापर्यंतच भाजप थांबले नाही, तर नरेंद्र पाटलांची संपूर्ण निवडणूक यंत्रणा भाजपनेच हातात घेतली होती. त्यांचे नेते, पदाधिकारी उदयनराजेंचा पराभव करण्यासाठी मोर्चेबांधणी करत होते. नरेंद्र पाटलांनी काय बोलायचे, कोणती टीका करायची, या सर्वांची आखणीही भाजपचेच धुरिण करत होते. त्या सर्वांतून जिल्ह्यामध्ये उदयनराजेंच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात आले; परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादीजन व उदयनराजेप्रेमी मतदार खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले. उदयनराजेंचे व्यक्तिमत्त्व मलिन करण्याच्या कोणत्याही ग्लोबेल्स नीतीच्या प्रचाराला मतदार भुलला नाही. साताऱ्यात उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी सर्व राष्ट्रवादीही अहोरात्र झटत होती. त्या परिश्रमाच्या व उदयनराजेंना मानणाऱ्या जनतेच्या प्रेमाच्या जोरावरच साताऱ्यातील भाजपचे मनसुबे धुळीला मिळाले. नरेंद्र पाटील निवडणूक जिंकतीलच, असे वातावरण निर्माण केलेल्या भाजपला मोठा झटका बसला. उदयनराजे तब्बल सव्वा लाख मतांनी निवडून आले. 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे सर्व आमदार निवडून आणण्याची जबाबदारी माझी, असे उदयनराजे अनेकदा जाहीरपणे म्हणाले. त्याचाही अपेक्षित परिणाम झाला; परंतु उदयनराजेंच्या विजयासाठी मनोमन झटणाऱ्या व मतदान करणाऱ्या नागरिकांना मात्र, काही दिवसांत वेगळ्याच बातम्या कानावर पडू लागल्या आहेत. उदयनराजे भाजपमध्ये जाणार, या चर्चेने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय अवकाश व्यापून गेले आहे. खुद्द उदयनराजेंनी अद्याप ठामपणे भाजपमध्ये जाणारच, असे जाहीर केलेले नाही; परंतु त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जिल्ह्यातील त्यांना मतदान केलेल्यांच्या हृदयात कालवाकालव सुरू झाली आहे. सर्वांच्या मनात एकच धास्ती आहे, उदयनराजे खरंच भाजपमध्ये जातील? असा निर्णय घेतील, या धास्तीला उदयनराजेंकडूनही ठोस भूमिका जाहीर करून आश्‍वस्त केले जात नाहीये. त्यामुळे संभ्रमात वाढ होत आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या प्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चांमध्ये, "राजे, अजून आमच्या बोटावरची शाई वाळलेली नाही,' असे सहज शब्द मतदारांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Words are popping out of voters' mouths about Udayanraje bhonsle