सांगोला-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु

दत्तात्रय खंडागळे 
शनिवार, 14 जुलै 2018

संगेवाडी : सांगोला - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन सिमेंट रस्त्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरु आहे. काँक्रिटीकरणाचे काम वेगात सुरु असले तरी रस्त्याकडील जमीन भूसंपादनाच्या कामाकडे आधिकाऱ्यांचे दूर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही ठिकाणी काम थांबल्याने याचा त्रास पंढरपुरकडे जाणाऱ्या दिंड्यांनाही होणार आहे.

संगेवाडी : सांगोला - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन सिमेंट रस्त्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरु आहे. काँक्रिटीकरणाचे काम वेगात सुरु असले तरी रस्त्याकडील जमीन भूसंपादनाच्या कामाकडे आधिकाऱ्यांचे दूर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काही ठिकाणी काम थांबल्याने याचा त्रास पंढरपुरकडे जाणाऱ्या दिंड्यांनाही होणार आहे.

पंढरपूर-सांगोला या 31 किमी रस्त्याच्या कामासाठी 173 कोटी मंजुर होऊन काम प्रगतीपतावर सुरु आहे. या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ 1 ऑगस्ट  2017 ला झाला आहे. 31 जुलै 2019 किंवा त्यापुर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. दहा मीटर सिमेंट काँक्रीटीकरण मुख्य रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजुस 2 मीटरच्या साईडपट्टया असणार आहेत. या राष्ट्रीय महामार्गासाठी सिमेंट  काँक्रिटीकरणाचे काम सांगोल्यापासुन खर्डीपर्यंत वेगात सुरु आहे. कंपनीतर्फे अत्याधुनीक यंत्रसामग्री, मनुष्यबळाद्वारे रस्त्याचे, मार्गातील येणारे छोटे-मोठे पुलांची कामेही सुर आहेत.

रस्त्यावर टाकण्यात येत असलेल्या मुरुम, मातीची तपासणी सँड क्रश, खडीची तपासणी एमएमआडीच्या वतीने करण्यात येत आहे. तर नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व पुलांची पाहणी गुणवत्ता नियंत्रण विभागाकडुन करण्यात येत असल्याने कामात गुणवत्ता दिसुन येते. येत्या आषाढी वारीपूर्वी सध्या सुर असलेले काम कंपनीतर्फे पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवस-रात्र कामे सुरु असुन पायी जाणाऱ्या दिंड्यांचा अडथळा दुर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या महामार्गाच्या कामासाठी शेतजमीन जात असलेले शेतकरीही सहकार्य करीत असले तरी भूसंपादनाबाबत आधिकाऱ्यांकडुन कोणतीही माहीती दिली जात नाही. सांगोला तालुका हद्दीतील बामणी, देशमुख वस्ती येथे शेतकऱ्यांनी काम थांबवले आहे. 

याठिकाणी जुना डांबरी रस्त्याच्या कडेला कामासाठी खोदलेले खड्डे हे काम थांबवल्यामुळे वारकऱ्यांसाठी धोकादायक ठरणार आहेत. येथील शेतकरी भूसंपादनाबाबत आम्हाला काहीही कळविण्यात येत नसल्याने आम्ही काम थांबविल्याचे सांगत आहेत. या अगोदरही संगेवाडी व परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम थांबविले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी भूसंपादन आधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेऊन काम सुरु केले होते. सध्या काही ठिकाणी काम थांबविलेल्या शेतकऱ्यांकडे आधिकाऱ्यांकडुन मात्र दूर्लक्षीत केले जात आहे.

भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तशा सुचना मी संबंधीत प्रांताधिकऱ्यांना देत आहोत. शेतकऱ्यांनी महामार्गाच्या कामामध्ये अडवणुक करु नये. 
- राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.

आम्ही रस्त्याच्या कामामध्ये अडवणुक करीत नाही परंतु आमच्या शेतजमीनीच्या भूसंपादनेचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. अगोदर भूसंपादन करा मगच रस्ता बनवा
- पंढरीनाथ देशमुख, शेतकरी, (देशमुखवस्ती, सांगोला).

साईड पट्ट्या डांबरीकरणाच्या असाव्यात 
सध्या सुरु असलेल्या पंढरपुर - सांगोला 10 मीटरचा मुख्य सिमेंट काँक्रिटीकरणचा रस्ता सोडुन दोन्ही बाजुस दोन मीटरच्या मुरमीकरणाच्या साईडपट्ट्या आहेत. भविष्यात पावसाळ्यामध्ये याचा त्रास छोट्या-मोठ्या वाहणांना होणार आहे. सध्या सुरु असणाऱ्या मुरमाच्या साईडपट्ट्याऐवजी त्या डांबरीकरणाच्या करण्यात याव्यात अशी मागणी वाहणधारक व रस्त्याकडील शेतकऱ्यांमधुन होत आहे.

Web Title: The work of Sangola-Pandharpur National Highway started on the war-footing