चौदा महिने झाले तरी मनरेगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त

हुकूम मुलाणी
सोमवार, 28 मे 2018

मंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले तरी मिळाले नसल्याने रोजगारसेवकांचे हाल सुरु आहे. दुष्काळी तालुक्यात या योजनेचे काम भविष्यात सुरु ठेवण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

मंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले तरी मिळाले नसल्याने रोजगारसेवकांचे हाल सुरु आहे. दुष्काळी तालुक्यात या योजनेचे काम भविष्यात सुरु ठेवण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

1 एप्रिल ते 31 मार्च 2018 या कालावधीत काम केलेल्या मजुरांच्या मजुरीच्या टक्केवारीवर हजेरी घेण्याऱ्या रोजगारसेवकांला मानधन दिले जाते. या वर्षभराचे मानधन 3 लाख 83 हजारांचे एफटीओ केले असल्याचे प्रशासन सांगत असले तरी अदयापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेचे काम तालुक्यातून हददपार करण्याची मानसिकता प्रशासनाची आहे का? असा सवाल विचारला जावू लागला आहे. 

शासनाचे 2019 पर्यत महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी 11 कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून नियोजन केले. तरी आजमितीस या नियोजनातील तालुक्यातील कामाची आकडेवाडी पाहता मोठी तफावत दिसून येते. रोहयोच्या माध्यमातून तालुक्यातील गावात पाणलोट कामे, विहीर, विहीर पुर्णभरण, फळबाग, घरकुल, रस्ते, शेततळे आदी कामे येतात. पण याकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विहीरी, रस्ते, शेततळी, घरकुल या कामाची आकडेवाडी पाहता पंचायत समितीने फक्त घरकुलाच्या माध्यमातून मजुरांना रोजगार मिळवून दिला विहीरी, शेततळे, रस्ते याकडे मात्र दुर्लक्ष केले. नेहमी मागे असणाऱ्या कृषी विभागाने मात्र शेततळी, फळबागेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दिला. 

पंचायत समिती व कृषी विभागाने मनावर घेतले तर तालुक्यातील दुष्काळ हटण्यास वेळ लागणार नाही. परंतु, पंचायत समितीकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. गेल्या काही दिवसापासून ऑपरेटर नसल्यामुळे मागणीप्रमाणे हजेरीपत्रक निघत नाहीत. प्रत्येक कुटूंबाला त्यांच्या मागणीप्रमाणे काम अजून देण्यात आले नाही. वास्तविक पाहता जलसंधारणाची असो अथवा कामस्वरुपी स्थावर मालमत्ता तयार होण्याच्या दृष्टीने यंदाच्या उन्हाळयात ही कामे करण्याची संधी होती. पावसाळा तोंडावर आला तरी याबाबत हालचाली थंड आहेत. तालुक्यात काम सुरु करण्याऐवजी नियमाचीच अधिक अमंलबजावणी केल्यामुळे या योजनेत काम करण्याची मजुरांची मानसिकता राहिली नाही. तालुक्यातील मजुर या कामावर जाण्यापेक्षा कासेगाव, पंढरपूरला गेलेले बरे म्हणून दररोज दक्षिण भागातील मजुर याठिकाणी कामासाठी जात आहेत. 

विनावेतन वर्षभर काम करुनही केलेल्या कामाचे मानधन मिळत नसल्यामुळे या योजनेचे काम पुढे कसे करायचे? या योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा होतात. मग आमचे मानधन देण्यास चौदा महिन्याचा कालावधी कशाला? 
सुनिल शिंदे तालुकाअध्यक्ष ग्रामरोजगारसेवक संघटना

Web Title: workers got angry because they did not receive the salary of MNRGA