कवलापुरात कामगाराला भोसकले; सांगली जिल्ह्यात चोवीस तासात दुसरा खून 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

एलसीबीच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते आहे.

 

सांगली ः कवलापूर (ता. मिरज) येथे एका परप्रांतियाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. कुंदन कुमार उराव (वय 23, सध्या रा. कवलापूर, मूळ रा. जाफरागंज, बिहार) असे त्या कामगाराचे नाव आहे. मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान, सकाळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. दुपारी एलसीबीच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते आहे. गेल्या चोवीस तासात दोन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 

संख (ता. जत) येथे तरूणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच कवलापूर (ता. मिरज) येथेही एका तरूणाचा भोसकून खून करण्यात आला आहे. मयत झालेल्या तरूणाने एका अल्पवयीन बालिकेशी गैरवर्तन केले होते. त्या रागातूनच काटा काढल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा करत आहे. मयत कामगारावर तीन वार करण्यात आले. छातीवरील घाव वर्मी बसल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीने संशयित चार हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी खुनाची कबुली दिली असून त्यांच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
 

संपादन ः शैलेश पेटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers stabbed in Kavalapur; The second murder in twenty-four hours