कोरोनानंतरचे जग : कॅशलेस इंडिया संकल्पनेला वेग येईल... 

 The world after Corona: Cashless India concept will gain momentum ...
The world after Corona: Cashless India concept will gain momentum ...

सांगली- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दीड महिन्यापासून सुरू असलेल्या "लॉकडाउन' चा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम जाणवतोय. "बॅंकिंग' व्यवसायाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. संसर्ग टाळण्यासाठी बॅंका ऑनलाईन बॅंकिंगचा वापर करण्यासाठी आवाहन करत आहे. तरूण पिढी मोबाईल बॅंकिंगचा सध्या वापर करतच आहे. आता ग्रामीण भागातील ग्राहकांनी देखील मोबाईल बॅंकिंगचा वापर करण्यासाठी साक्षर होण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने कोरोनानंतर "कॅशलेस' इंडियाकडे बॅंकिंग क्षेत्राची वाटचाल असेल. 

कॅशलेस इंडियाकडे वाटचाल- 
"लॉकडाउन' आणि संचारबंदीच्या काळात ग्राहकांनी मोबाईल बॅंकिंगचा सर्वाधिक वापर केला. मोबाईल बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, कर्जाचे हप्ते यासह काही गोष्टीसाठी मोबाईल बॅंकिंगसाठी कार्यरत असलेले ऍप वापरले. काहींना बॅंकांमध्ये जात येत नसल्यामुळे एसएमएस सुविधेद्वारे बॅलन्स बघितला. शहरी भागात मोबाईल बॅंकिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. परंतू ग्रामीण भागात आजही रोखीने व्यवहार करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे रोख रकमेसाठी एटीएम सुविधेचा वापर केला. कोरोनाच्या संकटात अनेकजण मोबाईल बॅंकिंगकडे वळले आहेत. त्यामुळे कॅशलेस इंडियाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसले. कोरोनानंतरही मोबाईल बॅंकिंगचा वापर आणखी वाढेल अशी परिस्थिती आहे. बॅंका देखील सध्या नेट बॅंकिंगसाठी अधिक आग्रह आहेत. लॉकडाउन नंतरच्या काळात देखील बॅंक ग्राहकांनी कॅशलेस व्यवहार करावे यासाठी आग्रही राहतील. एकीकडे कॅशलेस इंडियाकडे वाटचाल सुरू असली तरी दुसरीकडे कर्जासाठी मात्र ग्राहकांना बॅंकांमध्ये जावेच लागेल. 

बॅंकासमोर अडचणी 

कोरोना मुळे मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वसुलीला "ब्रेक' लागला. त्याचा परिणाम सर्वच बॅंकांच्या नफ्यावर जाणवला. नफ्याचे प्रमाण घटले. त्याचबरोबर "लॉकडाउन' मुळे नियमित कर्जदारांना तीन महिने मुदतवाढ दिली. त्यामुळे कर्जदारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. परंतू तीन महिने संपल्यानंतर कर्जाचे हप्ते वसुल करण्याचे बॅंकांसमोर मोठे आव्हान असेल. अनेकांनी पगारावर गृह, वाहन आणि शैक्षणिक कर्जे घेतली आहेत. परंतू "लॉकडाउन' मध्ये अनेक कर्जदारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना निम्म्या पगारावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे अशा पगारदार कर्जदारांकडील कर्ज वसुलीत अडचणी येणार आहेत. 

नफ्यावर परिणाम- 
कर्ज वसुलीसाठी तीन महिन्याची मुदतवाढ दिल्यामुळे पुढील वर्षात बॅंकांच्या नफ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. बॅंकांचा "एनपीए' देखील वाढेल. एनपीए वसुलीसाठी बॅंकांना ठोस पावले उचलावी लागतील. तर दुसरीकडे ठेवीदार आणि खातेदार यांना द्यावे लागणारे व्याज थांबणार नसून ते द्यावेच लागेल. कर्जावरील व्याज आणि ठेवीवरील व्याज यातील फरक म्हणजे बॅंकांची मिळकत असते. त्यामध्ये यामध्ये योग्य मेळ घालण्याची कसरत करावी लागेल. 

कर्जासाठी सवलत- 
लॉकडाउनच्या काळात बॅंकांमध्ये पैसे भरायला येणाऱ्यांची संख्या कमी असून पैसे काढायला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बॅंकांची उलाढाल निश्‍चितच कमी होणार आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर बॅंका अधिकाधिक कर्जे देण्यासाठी उत्सुक असतील. नवीन उद्योग किंवा छोट्या व्यवसायासाठी कर्जाची मागणी होऊ शकते. अशा कर्जदारांना आकर्षक सवलती किंवा कमी व्याजदर द्यावा लागेल. तरच बॅंकांचे अर्थकारण सुरळीत राहू शकेल. 

नेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंगमुळे बॅंकेत जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. बॅंका देखील विविध सॉफ्टवेअरचा अवलंब करून अपडेट होत आहेत. चेकबुकचा वापर हळूहळू कमी होत आहे. शहरी भागात मोबाईल बॅंकिंगचे प्रमाण वाढत असून ग्रामीण भागात त्याबाबत साक्षरता हवी आहे. बॅंकिंग क्षेत्रात ही क्रांती होत असताना सायबर क्राईमचा धोका देखील आहे. त्यामुळे ग्राहकांनी दक्ष राहिले पाहिजे.
-  भावेश शहा, संगणक तज्ज्ञ

ग्राहकांना साक्षर करावे लागेल

कर्जाचे हप्ते भरण्याची तीन महिन्याची मुदतवाढ संपल्यानंतर चौथ्या महिन्यात बॅंकांची वसुलीसाठी खरी कसोटी असेल. कर्ज वसुली हीच फार मोठी चिंतेची बाब असणार आहे. तसेच दुसरीकडे बॅंकांना गर्दी कमी करण्यासाठी ऑनलाईन बॅंकिंगबाबत ग्राहकांना साक्षर करावे लागेल.
- लक्ष्मीकांत कट्टी (निवृत्त बॅंक अधिकारी, अध्यक्ष बॅंक कर्मचारी समन्वय समिती) 

नियमात काही बदल करावे लागतील

कोरोनामुळे बॅंकासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. बॅंकांची उलाढाल कमी झाली आहे. पैसे भरणा करण्यापेक्षा काढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बॅंकांमध्ये तसेच एटीएममध्ये गर्दी होत आहे. ग्राहकांनी मोबाईल बॅंकिंगचा सुरक्षितपणे वापर करणे गरजेचे आहे. कोरोनानंतर बॅंकिंग व्यवसायातील नियमात काही बदल करावे लागतील.
-  सुधीर जाधव (अध्यक्ष, नागरी सहकारी बॅंक असोसिएशन, सांगली) 

भविष्यात मोबाईल बॅंकिंगचे प्रमाण वाढेल

महापुराच्या संकटानंतर बॅंकांपुढे सध्या कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. स्टॅन्डर्ड कर्ज खात्यांना मुदतवाढ मिळाली आहे. आम्ही चांगल्या कर्जदारांना दहा टक्के कर्ज वाढवून देणार आहोत. लॉकडाउननंतर गृह कर्जाची मागणी राहीलच. परंतू वाहन कर्जावर थोडा परिणाम होईल. कोरोनामुळे भविष्यात मोबाईल बॅंकिंगचे प्रमाण वाढेल.
- गणेश गाडगीळ (अध्यक्ष, सांगली अर्बन को-ऑप बॅंक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com