जागतिक ग्रंथ दिनानिमित्त 'आशय'ची अक्षरभेट 

रजनीश जोशी
रविवार, 22 एप्रिल 2018

मोबि डीक' या (हरमन मेलविल) कादंबरीच्या अनुषंगाने डॉ. जोशी यांनी वाचन प्रक्रियेचा बौद्धिक आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सोलापूर - येथील 'आशय' परिवारातर्फे सलग बाराव्या वर्षी जागतिक ग्रंथ व लेखन हक्कदिनानिमित्त (ता. 23 एप्रिल) रसिक वाचकांसाठी वाचनाचे महत्त्व सांगणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन केले जाते. यंदा 'अक्षर पाविजे निर्धारे'ची भेट देण्यात आली आहे. चित्रकार शिरीष घाटे यांनी त्याचे रेखाटन केले आहे. 

सोलापुरातील अग्रवाचक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या नितीन वैद्य यांनीच या पुस्तिकेचे संपादन केले आहे. गतवर्षी डॉ. आनंद जोशी यांच्या 'वाचनाचेनि आधारे' या प्रदीर्घ लेखाची मासिक आकारातील पुस्तिका वैद्य यांनी प्रसिद्ध केली होती, यावेळी त्याच लेखाचा उत्तरार्ध 'अक्षर पाविजे निर्धारे' या नावाने डॉ. जोशी यांनी लिहिला आहे. वरवरचे वाचन आणि सखोल वाचन याचे विश्‍लेषण त्यांनी केले आहे. 

'वाचनाचेनि आधारे'मधील मजकुराचे कन्नडमध्ये भाषांतर करून आनंद झुंझुरवाड या कवीने पुस्तक प्रकाशित केले होते. 'मोबि डीक' या (हरमन मेलविल) कादंबरीच्या अनुषंगाने डॉ. जोशी यांनी वाचन प्रक्रियेचा बौद्धिक आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. 

वाचन आणि लेखनाचा प्रभाव समाजावर किती असतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणून 'स्टारबक' या जगभरात असलेल्या साखळी कॉफीशॉपचा उल्लेख करता येईल. मोबिडीक कादंबरीतील स्टारबक हे एक पात्र आहे. या कॉफीशॉपच्या तीनही संचालकांच्या आवडीचे ते पात्र असल्याने त्यांनी आपल्या कॉफीशॉपला स्टारबक हे नाव दिले. जसे माणिक गोडघाटे यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे 'ग्रेस' हे टोपणनाव परिधान केले होते. उत्तम कादंबरी किंवा कथेचा, कवितेचा वाचकावर असा परिणाम होणे हे वाचनसंस्कृतीच्या विजयाचे लक्षण मानले पाहिजे, असे डॉ. जोशी यांना वाटते. 

नितीन वैद्य यांनी 'आशय' हे अनियतकालिक अनेक वर्षे चालवले. आर्थिक ओढगस्तीमुळे ते बंद केल्यानंतर आता शेक्‍सपियरची जयंती अर्थात वाचन हक्कदिवस ते वाचकांना अशा अनोख्या भेटी देऊन साजरा करतात. शिरीष घाटे यांनी या पुस्तिकेचे सुरेख मुखपृष्ठ केले आहे. 

आयुष्यात पुस्तकं येवोत, दिवसेंदिवस भेसूर होत चाललेल्या या जगात आयुष्यावरचा विश्‍वास कायम राहावा,यासाठी हा खटाटोप. 
नितीन वैद्य, संपादक, आशय

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: World Book Day New Book Launch