तेरा साथ है तो मुझे क्या कमी है...

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

दिव्यांग व्यक्तीसमवेत सुखी संसार करणारी उदाहरणे म्हणजे दुग्धशर्करा योगच.... आपल्या जीवनसाथीच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करून त्याच्या सुखःदुःखातच आपले विश्व सामावले आहे, अशी उदाहरणे आहेत. त्यापैकीच काही उदाहरणांचा उहापोह जागतिक दिव्यांग दिनानिमित्त.....

सोलापूर : प्रेम...या शब्दाची महती अशी की ज्याच्यासमोर माणूस सर्वकाही विसरून जातो. ज्यावेळी जीवनसाथीसंदर्भात प्रेमाचा संदर्भ येतो, त्यावेळी जीवनात आणखीन आनंद निर्माण होतो. दिव्यांग व्यक्तीसमवेत सुखी संसार करणारी उदाहरणे म्हणजे दुग्धशर्करा योगच.... आपल्या जीवनसाथीच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करून त्याच्या सुखःदुःखातच आपले विश्व सामावले आहे, अशी उदाहरणे आहेत. त्यापैकीच काही उदाहरणांचा उहापोह जागतिक दिव्यांग दिनानिमित्त.....

रामचंद्रने आणली वर्षाच्या जीवनात बहार
रामचंद्र व वर्षा खरटमल राष्ट्रीय स्तरावरील चित्रकार. रामचंद्र नॅार्मल तर वर्षा मूकबधीर. प्रेमाला जात-धर्म, रंग-रूप, गरीब-श्रीमंत कशाहाची अडसर नसतो. राम मूळचे सोलापूरचे तर वर्षा माने सातारची. दोघांचा आंतरजातीय विवाह. दोन्ही घरचा ऋणानुबंध निर्माण होताना वर्षाचा मूकबधीरपणा आडवा आला नाही. माणुसकीचा जिव्हाळा हीच या दोघांच्या लग्नाची पत्रिका होती. आंतरजातीय विवाहात आता नाविन्य राहीले नसले तरी, जन्मतःच मूकबधीर असलेल्या वर्षाशी विवाह करण्याचा निर्णय घेऊन रामचंद्रने वेगळी वाट चोखाळली. डिसेंबर 2004 मध्ये त्यांनी विवाह केला. चित्रकारीतेच्या क्षेत्रात आज दोघेही उत्तुंग शिखरावर आहेत. या दोघांनाही राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवले आहेत. 2007 मध्ये मानव या मुलाच्या रुपाने त्यांच्या जीवनात आणखीनच बहार आणली. आज तोही आपल्या आई-वडिलांप्रमाणेच चित्रकलेत प्रवीण होण्याची तयार करीत आहे. सध्या हे दांपत्य पुण्यात स्थायिक आहे. मन जुळली की जीवनात अनेक प्रकारचे रंग भरून जीवन कसे सुखी करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामचंद्र आणि वर्षा खरटमल.

कवितामुळे सुशीलकुमारांच्या जीवनाला दिशा
सुशीलकुमार महादेव शिंदे हे सोलापुरातील यशस्वी सीटकव्हर उद्योजक. लहानपणीच पोलिअो झाल्यामुळे उजवा पायाला अपंगत्व आले ते कायमचे. मात्र त्याचे दुःख न मानता बी.ए.च पदवी घेतली. वडिलांचा सीट कव्हर विक्रीचा व्यवसाय. त्यामुळे व्यवसायाची लहानपणापासूनच आवड. शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावर सुशीलकुमारांच्या विवाहाची चर्चा सुरु झाली. नोकरी नाही आणि त्यातच अपंगत्व. आजच्या जमान्यात मुलगी कोण देणार. डिसेंबर 2000 मध्ये लातूर जिल्ह्यतील  वडवळ गावातील कविताच्या रुपाने त्यांना जीवनसाथी मिळाली. लग्न ठरविताना अपंगत्वाची पूर्ण कल्पना पाहुण्यांना विशेष करतून कविताला दिली. तिच्या सहमतीनंतरच लग्नाचा मुहुर्त काढला. विवाहानंतर जोडप्यांचे आकर्षण हे फिरणे असते, मात्र सुशीलकुमारांच्या अपंगत्वामुळे ते शक्य झाले नाही. मात्र कविता यांनी त्याची कसलीही खंत न बाळगता नवजीवनाला सुरवात केली. छंद म्हणून तीने शिवणकाम शिकले, फॅशन डिझाईनचा कोर्सही पूर्ण केला. महेश आणि मोहित ही दोन फुलेही त्यांच्या जीवनवेलीवर फुलली आहेत. एकूणच पतीच्या अपंगत्वापेक्षा त्यांचा समजूतदारपणा आणि कुटुंब चालविण्याचे कौशल्याला साथ देत कविता यांनी सुशीलकुमारांच्या जीवनाला एक उज्ज्वल दिशा दिली आहे.

Web Title: world handicapped day celebration in Solapur