मनोरंजनाच्या माहोलात रेडिओ आजही ‘सुरेल’

मनोरंजनाच्या माहोलात रेडिओ आजही ‘सुरेल’

कोल्हापूर - वेळ रात्री साडेदहा-पावणे अकराची. शहरातील रस्त्यावर तुरळक गर्दी आणि गल्ली-बोळांतही शांतता; पण गल्लीतल्या एखाद्या तरी घरातून कोल्हापूर आकाशवाणीवरील रजनीगंधा कार्यक्रमातील गाण्याची धून ऐकू येतेच. ‘तेरे बिना जिंदगी से सिखवा तो नही’ अशा शब्दांची गुंफण असलेलं गाणं असेल तर त्याचा सूर कानालाच नव्हेतर असंख्यांच्या हृदयाला भिडतो. अकरा वाजता कार्यक्रम संपतो.

रेडिओ बंद होतो आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने शहरावर रात्रीचा अंमल सुरू होतो. मनोरंजनाची असंख्य साधने अवतीभवती असली तरी रेडिओ या माध्यमाची जादू आजही वेगळेपण कसे टिकवून आहे, याचा प्रत्यय येतो.

बुधवार (ता. १३) जगभर जागतिक रेडिओ दिन साजरा होत आहे. सर्व थरात सहजपणे भिडू शकणारे प्रभावी माध्यम म्हणून युनेस्कोने सहा वर्षांपासून रेडिओ दिन जाहीर करून रेडिओला सन्मान दिला आहे. जगातल्या कानाकोपऱ्यात गेला तरी रेडिओची धून ओझरती का होईना कानावर पडतेच आणि ते प्रभावी तंत्रज्ञानाने टिकवले गेले आहे.

कोल्हापूरचा विचार करता रेडिओ सिलोन, मुंबई आकाशवाणी, पुणे आकाशवाणी कोल्हापूरशी जोडले होते. हवामानातले अडथळे स्वीकारत खरखरत का होईना, घराघरातले व्हॉल्वचे रेडिओ त्यावर सुरू होते. पुढे सांगली आकाशवाणी आली. आता २६ वर्षे कोल्हापूर आकाशवाणी सुरू आहे आणि कोल्हापूर आकाशवाणीबरोबरच रेडिओ मिरची, रेडिओ टोमॅटो, रेडिओ सिटी, बिग एफएम हे खासगी रेडिओ आहेत. कळंबा कारागृहातही स्वंतत्र रेडिओ आहे. त्यामुळे घर, दुकान, दवाखाने, हॉटेल, वाहनांत रेडिओ सुरू असतोच असतो. केवळ गाणी, संगीत नव्हे तर माहिती, मुलाखती यासाठीही त्याचा वापर 
प्राधान्याने आहे.

या पार्श्‍वभूमीवर रेडिओ सेटचेही आधुनिकीकरण झाले आहे. अनेक घरांत आजही जुने रेडिओ आहेत. या शिवाय आधुनिक मोबाईलमध्ये रेडिओ अपरिहार्य आहे. मनोरंजनाची साधने असली तरी रेडिओचा करिश्‍मा कायम आहे.

कोल्हापूर आकाशवाणी काही दिवसांत सलग १७ तास १० मिनिटे चालू राहणार आहे. पहाटे सुरू झालेले रेडिओचे कार्यक्रम रात्री अकरा वाजून १० मिनिटांपर्यंत सलग सुरू राहतील. शिवाय प्रक्षेपण क्षमता ६ किलोवॅटवरून १० किलोवॅटपर्यंत होणार आहे. त्यामुळे कर्नाटक कोकणातही आकाशवाणी ऐकता येणार आहे.
- तनुजा कानडे,
संचालिका, कोल्हापूर आकाशवाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com