#WorldTourismDay आपणच आपले निसर्गवैभव दाखवूया !

सुधाकर काशीद
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

‘पर्यटनाला विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, आजरा, चंदगड, गगनबावडा या तालुक्‍यांत निसर्ग पर्यटनाला खूप वाव आहे. या तालुक्‍यात जंगल आहे. घाट आहेत. वन्यजीवांचे वास्तव्य आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी व स्वस्त घरगुती जेवण आहे. आता बऱ्यापैकी राहण्याचीही सोय आहे.

कोल्हापूर -‘‘आम्ही चकाट्या पिटत गावातल्या कट्ट्यावर बसलेलो असायचो. एखादी ट्रॅव्हल बस आम्हाला बघून वेग कमी करायची. डोळ्यावर किंवा डोक्‍यावर गॉगल असलेला एकजण बसमधून उतरायचा. ‘इकडे बघायला काय काय आहे’, असे आम्हाला विचारायचा. आम्ही हौसेने त्याला सांगत राहायचो; मग तो आमच्यातल्या एकाला ‘चल येतो का? आमच्याबरोबर दाखवायला’, असं म्हणत, म्हणत ‘थम्स अप’ची थंडगार बाटली आम्हाला द्यायचा. आम्ही खूश. दिवसभर त्यांना जंगल, दरी, तटबंदी, धरण फिरून दाखवायचो. जाता जाता तो ‘थॅंक्‍यू मुलांनो,’ असे म्हणत निघून जायचा. नंतर आम्हाला कळाले, की हे कोल्हापूर जिल्ह्याची कसलीही माहिती नसलेले बाहेरचे काही लोक आमची फुकट मदत घेतात आणि स्वतः मात्र पर्यटकांकडून कमाई करतात; मग आम्ही ठरवले, की आमच्या परिसराचे खरे वैभव आपणच पर्यटकांना दाखवायचे आणि फार नाही; पण जरा तरी काही कमवायचे...’’ 

राधानगरीच्या बायसन नेचर क्‍लबचा सम्राट केरकर हा तरुण त्याच्या पर्यटन क्षेत्रातील थोड्याफार वाटचालीचे अनुभव सांगत होता. त्याच्या मते, ‘‘पर्यटनाला विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, आजरा, चंदगड, गगनबावडा या तालुक्‍यांत निसर्ग पर्यटनाला खूप वाव आहे. या तालुक्‍यात जंगल आहे. घाट आहेत. वन्यजीवांचे वास्तव्य आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी व स्वस्त घरगुती जेवण आहे. आता बऱ्यापैकी राहण्याचीही सोय आहे. वास्तविक लोकांना आता उत्तर भारत, दक्षिण भारत अशा पर्यटनाऐवजी असं घाटमाथ्यावरचं हिरवंगार, गावरान पर्यटन हवे आहे. कोलाहलापासून लांब असं त्यांना एकदोन दिवस राहायचे आहे. नेमकी पर्यटकांची ही गरज ओळखून बायसन नेचर क्‍लबने व्हॉटस्‌अप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक आवाहन केले व ‘राधानगरीत या, आम्ही तुम्हाला राधानगरी, दाजीपूर परिसराचे अपरिचित अंतरंग दाखवतो,’ अशा शब्दांत पर्यटकांना साद घातली. आज सगळेच पर्यटक नाहीत; पण बहुतेक पर्यटक बायसन नेचर क्‍लबशी संपर्क साधतात; मग सम्राट केरकर व त्यांचे सहकारी पर्यटकांच्या राहाण्याची, जेवणाची सोय करतात. पर्यटक छोट्या छोट्या धनगर वाड्यातील घरातून सारवलेल्या जमिनीवर, अंगणात आनंदाने पाठ टेकतात. भाजीभाकरी, दही, डांगर, गावठी कोंबडी, मटण, खेकडा, मासे यांचे घरगुती जेवण पोटभर घेतात. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. याशिवाय आपल्या घरातले साधे; पण रुचकर जेवण पर्यटक आनंदाने घेतात. याचे खूप मोठे समाधान इथल्या माऊलीला आहे.’’ 

थक्क करणारे पर्यटन... 
राधानगरी तालुक्‍यातली घनदाट झाडी बघून पर्यटक अक्षरशः थक्क होतात. गव्याच्या कळपांचे दर्शन घडले तर आनंदाने वेडेच होतात आणि विशेष हे, की राधानगरी, काळम्मावाडी परिसरात गव्यांचे दर्शन बहुतेकवेळा घडतेच. 
- सम्राट केरकर,
बायसन नेचर क्‍लब

इतर तालुक्‍यांत प्रयत्न व्हावा
बायसन नेचर क्‍लबसारखा प्रयत्न शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, चंदगड तालुक्‍यांतील तरुणांनी एकत्र येऊन करावा, असे राधानगरीतल्या या तरुणांचे आवाहन आहे. कारण हे पाच तालुके इतके निसर्गसंपन्न आहेत, की पर्यटकांना त्यांचे अंतरंग दाखवू तितके थोडेच आहे आणि ही तशी कमाईचीही संधी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world Tourism Day Special