जिद्दीने बनली ही रणरागिणी उद्योजिका

श्रीनिवास दुध्याल
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

- पतीच्या अकाली निधनानंतर आटा चक्की चालवत सावरला संसार
- पापड उद्योगासाठी अवघ्या 1.70 लाखाच्या कर्जासाठी केला संघर्ष
- बॅंकेसमोर आंदोलन करून मिळवले कर्ज व व्याज अनुदानही
- देणार बेरोजगार व गरजू महिलांना रोजगार

सोलापूर : एक गृहिणी... पतीचे 2012 मध्ये हृदयविकाराने निधन... निधनाच्या एक महिन्याअगोदर पतीने घरात एक आटा चक्की आणलेली... मात्र ही आटा चक्कीच त्यांच्या पश्‍चात पत्नीला संसाराचा गाडा हाकण्यासाठी मोलाची ठरली... लोकांचे धान्य दळत पत्नीने दोन मुलांचे शिक्षण केले. एका मुलाचे लग्नही केले... एप्रिल 2019 मध्ये त्यांनी कर्ज काढून पापड मशिन घेतली... त्याद्वारे विविध प्रकारच्या पापड उत्पादनाला सुरवात केली... मात्र हे कर्ज मिळवण्यासाठी त्यांना सात महिने बॅंकेच्या चकरा माराव्या लागल्या... कर्ज नाकारणाऱ्या बॅंकेविरुद्ध प्रसंगी आंदोलन करावे लागले... शेवटी या रणरागिणीला कर्ज मंजूर झाले... आता पापड उत्पादनाद्वारे गरीब बेरोजगार महिलांना रोजगार देऊन हा उद्योग वाढवण्याचा त्यांचा मानस आहे...

हेही वाचा : भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी

गृहिणी ते उद्योजिका बनण्यासाठी व संसाराचा गाडा हाकण्यासाठी अनेक संकटांना सामोऱ्या जाणाऱ्या या रणरागिणी आहेत सोलापूरच्या रहिवासी प्रमिला चव्हाण. एका बॅंकेत वाहनचालक असलेल्या पतीच्या निधनानंतर प्रमिलाताईंनी आटा चक्कीद्वारे त्यांच्या दोन लहान मुलांचे शिक्षण पूर्ण केले. एका मुलाचे लग्न झाले असून, एक मुलगा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

हेही वाचा : अजित पवार म्हणतात मी

प्रमिलाताई एवढ्यावर समाधानी नव्हत्या. त्यांनी उद्योजिका होण्याच्या दिशेने विचार करावयास सुरवात केली. मुलाच्या मोबाईलमध्ये यू-ट्यूबवरील एका पापड मशिनबाबत त्यांनी माहिती घेतली. मात्र मशिन खरेदी करण्याएवढे त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज अनुदानाची माहिती मिळाली. त्यांनी सप्टेंबर 2018 मध्ये महामंडळाकडून व्याज अनुदानाचे प्रमाणपत्र मिळवले. एका बॅंकेत कर्ज प्रकरणही सादर केले. मात्र बॅंकेचे अधिकारी त्यांना कर्ज नाकारले. सात महिने बॅंकेच्या चकरा मारूनही त्या नाउमेद झाल्या नाहीत. त्यांनी थेट मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर श्री. पवार यांच्यासह त्यांनी बॅंकेविरुद्ध हलगीनाद आंदोलनात सहभागी झाल्या. यानंतर मात्र बॅंकेने एप्रिल 2019 मध्ये प्रमिलाताईंना अडीच लाखाची मागणी असताना केवळ एक लाख 70 हजारांचे कर्ज मंजूर केले.

हेही वाचा : भाजपला मी व्यापारी समजत होतो पण...

कर्ज मंजुरीनंतर प्रमिलाताईंनी लगेच पापड बनविणारी स्वयंचलित मशिन आणली. या मशिनद्वारे त्या उडीद पापड उत्पादनाला सुरवात केली. मार्केटिंगसाठी जिल्हाभर प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी त्यांच्या पापडांना चांगली मागणी आहे. अशीच मागणी वाढत राहिल्यास इतर महिलांना या उद्योगात रोजगार देण्याचा त्यांचा विचार आहे.
-
यापुढे बेरोजगार महिलांना देणार रोजगार
पतीने आणलेल्या आटा चक्कीमुळे घर सावरले. पापड उत्पादनासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज अनुदानाची माहिती मिळताच कर्जासाठी प्रयत्न केला. मात्र बॅंक अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. शेवटी माऊली पवार यांच्यासह "त्या' बॅंकेसमोर हलगीनाद आंदोलन केले. त्यानंतर कर्ज मिळाले. उडीद पापडाचे उत्पादन सुरू केले असून, कर्जाचे हप्ते वेळेवर भरत आहे व व्याज अनुदानही मिळत आहे. यापुढे बेरोजगार महिलांनाही याद्वारे रोजगार देणार आहे.
- प्रमिला चव्हाण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Worrior Woman Became Entrepreneur