दक्षिण काशी वाईत विश्वकल्याणासाठी सर्वारिष्टयशान्तर्थ श्री. महारुद्र स्वाहाकार वैदिक उपासना

भद्रेश भाटे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

दरवर्षी आषाढ महिन्यात चार दिवस चालणाऱ्या या उपासनेत गणेशयाग, सप्तशती श्री. दुर्गापाठयुक्त हवन, त्रयोदशाक्षरी श्रीराम महामंत्र जपानुष्ठान, आरती, मंत्रपुष्प, भजन व कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   
 

वाई - येथील अखिल वैदिक ब्रम्हवृंद मंडळातर्फे कृष्णातीरावरील श्री. काशिविश्वेश्वर मंदिरात सोमवार (ता. 6) पासून, सर्वारिष्टयशान्तर्थ श्री. महारुद्र स्वाहाकारव्दारा वार्षिक वैदिक उपासना सुरु आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात चार दिवस चालणाऱ्या या उपासनेत गणेशयाग, सप्तशती श्री. दुर्गापाठयुक्त हवन, त्रयोदशाक्षरी श्रीराम महामंत्र जपानुष्ठान, आरती, मंत्रपुष्प, भजन व कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   

गेल्या अनेक वर्षांपासून श्री. क्षेत्र दक्षिणकाशी वाईत समस्त राष्ट्रामध्ये समता व शांती नांदावी, अशांततेला कारणीभूत असलेला व्देषभाव मावळावा, सर्व दुःखांना कारणीभूत असलेला अधर्म, अनिती, दुराचार व अविचार नाहीसा होऊन समस्त भारत बलशाली, वैभवसंपन्न, व सुखी व्हावा. तसेच त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना भगवंताचे अधिष्ठान प्राप्त होऊन यश यावे व समस्त विश्वाचे कल्याण व्हावे, या हेतूने ही उपासना करण्यात येते. यंदा 69 वे वर्ष आहे. याप्रसंगी वेदमूर्ती शंकरराव अभ्यंकर यांचा शंभर वर्षपूर्ती निमित्त विशेष आदर सत्कार करण्यात येणार आहे. या उपासनेत गंगापुरी, गार्गी, व अंबिका- सिध्दनाथवाडी भजनी मंडळाचे भजन, ह. भ. प. इंद्रजित कानडे, शरदचंद्र कळसकर, सदाशिव जोशी (इचलकरंजी) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (ता. 9) श्री महारुद्र स्वाहाकाराने उपासनेची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी या होमहवन व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. महारुद्र स्वाहाकार समितीने केले आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Worship at western kashi vaai