ढेकळातील कुस्त्या पैलवानांच्या जिवावर...

Wrestling
Wrestling

पाचशे रुपयांसाठी ढेकळांत कुस्ती... असे गावोगावच्या यात्रांत होणाऱ्या कुस्ती मैदानातील चित्र आहे. ना रुग्णवाहिका, ना डॉक्‍टर, ना स्वच्छतागृहाची सोय! विमा न उतरविताच कुस्तीपटूंना मैदानात लढतीला उतरविले जाते. राज्यभरात दरवर्षी शेकडो कुस्तीपटू छोट्या-मोठ्या दुखापतींना सामोरे जात असल्याचे सांगण्यात येते. कुस्ती जिवंत राहावी, या उदात हेतूने मैदान भरविणाऱ्यांचे कौतुक आहेच. पण, मैदानासाठी भुसभुशीत लाल माती उपलब्ध करण्याकडे ते दुर्लक्ष करतात. मैदानांच्या आयोजनाला काटेकोर नियम हवेत, असा सूर कुस्तीतील जाणकारांचा आहे.

घातकी डाव असे 
 बॅक थ्रो
 बॅक साल्टो
 उलटी पुट्टी

मैदान भरविताना लक्षात घ्या...
 जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाची मान्यता घ्या
 समर्थकांना आखाड्यापासून १५ फूट अंतरावर बसवा
 मैदानालगत पाणी, फिरत्या स्वच्छतागृहाची सोय हवी
 मैदानावेळी रुग्णवाहिका उपलब्ध करा
 पैलवानांचा विमा उतरवा

जिल्हा व राष्ट्रीय तालीम संघाने काय करावे..?
 गावोगावच्या यात्रांत मैदानांसाठी नियमावली करावी
 तालीम संघाच्या वेबसाइटवर राज्यभरातील मैदानांची माहिती द्यावी 
 दरवर्षी आखाडानिहाय कुस्तीपटूंची नोंदणी करावी
 नोंदणीचे शुल्क नाममात्र घ्यावे
 कुस्तीपटूंचे प्रोफाईल बनवावे
तालीम संघाची मान्यता न घेण्याची कारणे
 तालीम संघाच्या नियमाप्रमाणे मैदान घ्यावे लागेल
 त्यांच्या पंचांना आमंत्रित करावे लागेल
 हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांना बोलावून त्यांचा सन्मान करावा लागेल

जाम (ता. खटाव, जि. सातारा) येथील विकास भोईटे या पैलवानाच्या मणक्‍याला सरावादरम्यान गंभीर दुखापत झाली. चार वर्षे तो अंथरुणावर आहे. आई, वडील, बहीण त्याच्या उपचाराचा खर्च पेलतायत. गतवर्षी पुण्यातील मॅटवरील कुस्तीच्या लढतीत विकी साष्टे याच्या मानेला दुखापत झाली होती. त्यात त्याचा मृत्यूही झाला.  

 अभ्यासक, गणेश मानुगडे म्हणाले,  कुस्तीपटूंना मैदानात होणाऱ्या दुखापतीनंतर उपचाराचा खर्च पेलण्यासाठी कोणी पुढे येत नाही. ही स्थिती लक्षात घेता कुस्ती मल्लविद्या पैलवान सहायता केंद्र व सांगाती सामाजिक संस्थेतर्फे मैदानात जखमी होणाऱ्या कुस्तीपटूंच्या उपचाराचा खर्च केला जातो. त्यासाठी पैलवानाने दुखापतीचा अहवाल त्यांना द्यावा लागतो.

मैदानाची काळजी
कुस्त्या सुरू असताना मैदानातील मातीला वारंवार पाण्याची फवारणी, तसेच मातीचे काही कुस्त्यानंतर उकरणे यासाठी पाण्याची व्यवस्था व शेतीसाठी वापरण्यात येणारे रोटावेटर (पॉवर टिलर ) मैदानावेळी उपल्बध ठेवण्याची गरज आहे.

आखाडा हा २३ बाय २३ फुटांचा असतो. त्याची खोली सुमारे ८ फूट असते. त्यातील मातीत तेल, दही, लिंबांचा रस, दोन पोती काव, हळद, मीठ यांचे मिश्रण असते. ही मातीच कुस्तीसाठी आवश्‍यक ठरते. 
- राम सारंग, सुवर्णपदक विजेते.

मैदानापूर्वी पंधरा-वीस दिवस अगोदर सांगावे लागते. गावोगावच्या मैदानांसाठी या पद्धतीचा विमा उतरवणे पैलवानांसाठी फायदेशीर ठरेल.  
- केशव गोवेकर, डेव्हलपमेंट ऑफिसर, एलआयसी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com