यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे कृतज्ञता पुरस्कार या त्रिमूर्तींना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नगर : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणारे कृतज्ञता पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांना जाहीर झाले आहेत. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख आणि जलसंपदामंत्री शंकरराव गडाख यांनी ही माहिती दिली. 

नगर : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणारे कृतज्ञता पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांना जाहीर झाले आहेत. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख आणि जलसंपदामंत्री शंकरराव गडाख यांनी ही माहिती दिली. 

सोनई (ता. नेवासे) येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात रविवारी (ता. 23) दुपारी चार वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख अध्यक्षस्थानी असतील. दरम्यान, याच सोहळ्यात आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिष्ठानातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. 

यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सामाजिक कार्यकर्त्या नसिमा हुरजूक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, अभिनेते सयाजी शिंदे, दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे, डॉ. स्मिता व डॉ. रवींद्र कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर, कवी रामदास फुटाणे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

न्या. नरेंद्र चपळगावकर 
वाङ्‌मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्यायाधीश नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश असून, वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील व सत्त्वशील मराठी लेखक आहे. 2005मध्ये माजलगाव येथे झालेल्या 26व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे, तसेच 2014मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या नवव्या जलसाहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची सुमारे तीस पुस्तके प्रकाशित असून, त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक संस्थानचे वाङ्‌मय पुरस्कार मिळाले आहेत. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो 
कॅथॉलिक पंथाचे धर्मगुरू व मराठी लेखक असलेले ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ख्रिस्ती व ज्यू धर्म हे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. जानेवारी 2020मध्ये उस्मानाबाद येथे झालेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या "सुबोध बायबल- नवा करार' या पुस्तकासाठी 2013मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार, तर 2017मध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची आतापर्यंत अकरा पुस्तके प्रकाशित आहेत. 

डॉ. पी. डी. पाटील 
डॉ. पी. डी. पाटील हे पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत. ते पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे जानेवारी 2016मध्ये झालेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. एक उत्कृष्ट शिक्षण संस्थाप्रमुख म्हणून स्वत:ची जडणघडण करणारे डॉ. पाटील यांचे ज्ञानक्षेत्रातले योगदान राहिलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashwant Social Faundetion Gratitude Award declare