यशवंतराव गडाख "मातोश्री'वर

सुनील गर्जे
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

राज्यात भाजप-शिवसेनेचा सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच, ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट बरेच काही सांगून जाते.

नेवासे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी आज "मातोश्री'वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी भगवी शाल व पुष्पगुच्छ देवून गडाख यांचे स्वागत केले.

नेवासाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते गडाख व उद्धव ठाकरे यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. राज्यात भाजप-शिवसेनेचा सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच, ज्येष्ठ नेते गडाख यांची भेट बरेच काही सांगून जाते.

कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'च्या राष्ट्रीय व राज्यातील नेत्यांशीही ज्येष्ठ नेते गडाख व परिवारांचे असलेले सलोख्याचे संबंध सर्वश्रूत आहेत. शिवसेनेचे भाजपशी सत्तासमीकरण जुळले नाही, तर सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मन वळविण्याचे जबाबदारी ज्येष्ठ नेते गडाख यांच्यावर सोपविली जाण्याची शक्‍यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते गडाख यांचा सत्कार केला. शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे "फटकारे' हे पुस्तक त्यांना भेट दिले. शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार शंकरराव गडाख, युवा नेते प्रशांत पाटील गडाख, नितीन सोमवशे आदी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashwantrao Gadakh on "Matoshree"