कोल्हापुरात मंडळांनी ठरवले यंदा गणेशोत्सव साधेपणाने

कोल्हापुरात मंडळांनी ठरवले  यंदा गणेशोत्सव साधेपणाने

कोल्हापूर - जिंदादिली कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव म्हणजे वर्षभर सळसळती ऊर्जा देणारा आनंद सोहळा. नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं अगदी परदेशात जरी असला तरी प्रत्येक कोल्हापूरकर गणेशोत्सवासाठी हजेरी लावतोच, पण यंदाचा महापुराचा विळखाच इतका घट्ट होता, की कोल्हापूरकरांना कोल्हापूरकरांसाठी पहिल्यांदाच मदतीसाठी पुढे यावे लागले. राज्यभरातूनही मोठ्या संख्येने मदतीचा ओघ आला. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर शहरातील तालीम संस्था, तरुण मंडळांनीच आता यंदाचा उत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे.  एकूण दहा दिवस यंदा बाप्पांचा मुक्‍काम असेल. परंपरा म्हणून काही मंडळे छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत, तर काही मंडळांनी जमा होणाऱ्या वर्गणीतून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

भव्य मिरवणुकांना बहुतांश मंडळे फाटा देणार असून, देखाव्यांच्या माध्यमातून महापुरावरच प्रबोधनाचा निर्णयही काही मंडळांनी घेतला आहे. मंगळवार पेठेतील दीडशेहून अधिक तालीम व तरुण मंडळांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन पहिले पाऊल उचलले. प्रत्येक मंडळाने पूरग्रस्तांना २१ हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाजी पेठेतील मंडळांनीही उत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे, पूरग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता.१९) शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवाजी मंदिर येथे बैठक होणार आहे. एकूणच यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी साऱ्या शहरातील तालमी व मंडळे पुढे 
सरसावली आहेत.

तालमीतर्फे यंदा साधेपणानेच उत्सव होणार आहे. फक्त परंपरेनुसार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणूकही साधेपणानेच होणार असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत एकवीस हजार रुपयांची रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली जाणार आहे. 
- राजेंद्र ठोंबरे, पाटाकडील तालीम मंडळ

शिवाजी पेठेत अडीचशेहून अधिक तालीम व मंडळे आहेत. सर्वांना उत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी आवाहन करणार आहे. वर्गणीचीही कुणावर सक्ती करू नका, अशी विनंती करणार आहे. तालीम व मंडळांची अशी संपूर्ण पेठेची म्हणून पूरग्रस्तांना मदत दिली जाईल.
- सुजित चव्हाण, शिवाजी तरुण मंडळ

देखावा व मिरवणुकीची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. मात्र, महापुरामुळे उत्सव साधेपणानेच करणार आहे. दोन दिवसांत मंडळांची बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाणार आहे. चौंडेश्‍वरी हॉलमध्ये शहरातील पूरग्रस्तांसाठी कार्यक्रम घेणार असून, निलेवाडी या गावासाठीही मदत केली जाणार आहे.
- गजानन यादव, लेटेस्ट तरुण मंडळ.

तालमीतर्फे यंदा कुणाकडेही वर्गणी मागितली जाणार नाही. प्रतिवर्षाप्रमाणे होणारी भव्य मिरवणूकही यंदा तालमीने रद्द केली आहे. उत्सव काळात सर्व धार्मिक विधी होणार आहेत. त्याशिवाय दानपेटीत जी रक्कम जमा होईल, ती सर्व पूरग्रस्तांच्या निधीसाठी दिली जाणार आहे.  
- महेश जाधव, तटाकडील तालीम.

मंडळाने सजावट, रोषणाईला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने मंडप व धार्मिक विधी होतील. आम्ही वर्गणी कधीच मागत नाही. मात्र, गणेशोत्सव संपल्यानंतर शिल्लक राहिलेली सर्व रक्कम पूरग्रस्तांच्या निधीसाठी सुपूर्द केली जाईल.
- अजित सासने, 
संभाजीनगर तरुण मंडळ. 

महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे उत्सवातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. उत्सव काळात केवळ धार्मिक विधी होतील. गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकही साधेपणाने असेल. आरे (ता. करवीर) गावातील पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. 
- राजू मेवेकरी, महालक्ष्मी भक्त मंडळ

तालमीतर्फे साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. तालमीत फक्त गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मूर्ती आगमन आणि विसर्जनाची मिरवणूकही टाळ्यांच्या गजरात काढण्याचा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्तांसाठी आवश्‍यक मदतही केली जाणार आहे.  
- संभाजीराव जगदाळे, 
बजापराव माने तालीम.

मंडळातर्फे यंदा फक्त गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. उत्सव काळात धार्मिक विधी वगळता कोणतेही इतर कार्यक्रम नसतील. उत्सवावरील सर्व खर्चाला फाटा देत रक्कम पूरग्रस्तांच्या निधीसाठी देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला आहे. 
- सूरज साळोखे, 
मरगाई गल्ली मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com