सोलापूर बाजार समितीला यंदा 21 कोटींचे उत्पन्न 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

यंदाच्या आर्थिक वर्षात बाजार समितीची उलाढाल 1 हजार 44 कोटी रुपयांची झाली असल्याची माहिती समितीचे प्रशासक सुरेश काकडे व सचिव मोहन निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला यंदाच्या आर्थिक वर्षात (2017-18) 21 कोटी 51 लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. यंदा 16 कोटी 41 लाख रुपयांची बाजार फी वसूल झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात बाजार समितीची उलाढाल 1 हजार 44 कोटी रुपयांची झाली असल्याची माहिती समितीचे प्रशासक सुरेश काकडे व सचिव मोहन निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूर बाजार समितीने यंदा प्रथमच एक हजार कोटींच्या पुढे उलाढाल केली आहे. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी भरलेला सेस, त्यांच्याकडून येणेबाकी असलेली रक्कम याबाबतची प्रपत्रके व्यवस्थित केल्याने यंदा बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. समितीचे उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांना समितीच्यावतीन देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये येत्या काळात वाढ करणे शक्‍य असल्याचेही सचिव निंबाळकर यांनी सांगितले. सोलापूर समितीमध्ये यंदा कांदा विक्रीतून उच्चांकी उलाढाल झाली आहे. यंदा झालेल्या एक हजार कोटींच्या एकूण उलाढालीमध्ये कांदा खरेदी-विक्रीची उलाढाल 624 कोटी 29 लाख रुपये एवढी आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कांदा बाजारपेठेच्या तुलनेत सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची उलाढाल झाली आहे. 

भुसार बाजार फी, गूळ बाजार फी, फळे व भाजीपाला बाजार फी, कांदा, कडबा, जनावर, स्वस्त धान्य बाजार, फुले बाजार फी या माध्यमातून यंदा 16 कोटी 41 लाख रुपयांची फी वसूल झाली आहे. 2016-17 मध्ये 10 कोटी 63 लाख, 2015-16 मध्ये 13 कोटी आणि 2014-15 मध्ये 12 कोटी रुपयांची बाजार फी वसूल झाली होती. या पत्रकार परिषदेला सहाय्यक सचिव दत्तात्रेय सूर्यवंशी, माजी प्रभारी सचिव विनोद पाटील,सिद्धेश्‍वर राजमाने, अंबादास बिराजदार आदी उपस्थित होते. 

आकडे बोलतात... 
मागील चार वर्षातील उलाढाल 
2014-15 : 969 कोटी 
2015-16 : 922 कोटी 
2016-17 : 657 कोटी 
2017-18 : 1 हजार 44 कोटी 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: This year the Solapur Bazar committee has generated Rs 21 crores