यंदा ऊस उत्पादन १ कोटी टनाकडे

यंदा ऊस उत्पादन १ कोटी टनाकडे

सांगली - कृष्णा-वारणाकाठासह टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना लाभक्षेत्रात उसाची लागवड यंदा वाढली आहे. गेल्यावर्षी पाणीटंचाईमुळे उत्पादन ५० लाख टनांपर्यंत खाली आले; मात्र दोन वर्षांत हा आकडा दुप्पट म्हणजे १ कोटी टनापर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. अशावेळी जिल्ह्यातील साखर कारखाने बंद राहणे ऊस उत्पादकांसाठी संकटाची घंटा आहे. उसाचे उशिरा गाळप, दर पाडून खरेदी आणि तोडकऱ्यांकडून लूट, या समस्या डोकेदुखी ठरतील.

जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ७५ ते ८५ लाख टन उसाचे उत्पादन होते. पैकी १० ते १५ लाख टनांपर्यंत ऊस कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकातील कारखाने उचलतात. जिल्ह्यात ७० लाख टनांच्या जवळपास गाळप होते. सध्या ऊस लागवडीचा झपाटा पाहिल्यास या उत्पादनात वाढ होऊन ते १ कोटी टनापर्यंत जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव, खानापूर पट्ट्यात ऊस शेती  झपाट्याने वाढू लागली. द्राक्ष, डाळिंब बाजार अस्थिर होत असतानाच भाजीपाला उत्पादकांनाही वारंवार मुंबई, हैदराबाद, दिल्लीच्या बाजाराने झटका दिला. परिणामी, गड्या आपला ऊस बरा, अशी धारणा शेतकऱ्यांना होताना दिसते आहे. या स्थितीत इतका ऊस वेळेत गाळू शकतील, एवढे कारखाने जिल्ह्यात आहेत. परंतु त्यापैकी चार कारखाने सध्या संकटात आहेत.

त्याचा ताण हंगामावर येणार आहे. तासगाव कारखान्याचे अस्तित्वच संकटात आहे. भविष्यात तो कधी सुरू होईल, याविषयी स्पष्टता नाही. जतचा डफळे कारखाना साखराळेतील राजारामबापू कारखान्याने विकत घेतला, मात्र गाळपात सातत्य नाही. नागेवाडीचा (ता. खानापूर) यशवंत कारखाना खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाने भागीदारीत खरेदी केला. त्याचा व्यवहार अद्याप लटकला आहे. तोही यंदा व्यवस्थित चालू शकला नाही. त्यात वसंतदादा कारखान्याची भर पडली आहेच.

उत्पादन वाढीची कारणे
शेतीत अत्याधुनिक प्रयोग 
एकरी उत्पन्न वाढीवर भर
दुष्काळी टापूत लागवड वाढली
ठिबकसह पेपर टॅंकचा प्रयोग 
द्राक्ष, डाळिंब उत्पादकही उसाकडे
भाजीपाला दर अस्थिरतेचाही परिणाम

कसरत करणारे कारखाने
यशवंत (नागेवाडी), 
राजारामबापू युनिट ४ (जत) 
वसंतदादा (सांगली) 
तासगाव-पलूस (तासगाव)
एकूण परिणाम सुमारे १५ ते २० लाख टन

दृष्टिक्षेपात जिल्हा उत्पादन
दरवर्षी  ७५ ते ८५ लाख टन ऊस.
१० ते १५ लाख टन जिल्ह्यातून बाहेर. 
जिल्ह्यात ७० लाख टन गाळप.
यंदा १ कोटी टनावर उत्पादन जाणार.

गाळणार कुठे ?
चार साखर कारखाने अडचणीत
उत्पादकांसमोर संकटच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com