Women's Day 2019 : येस वी कॅन...

Women's Day 2019 : येस वी कॅन...

मोबाईलच्या वेडाने हरवतोय संवाद...!
- ऋतुजा क्षीरसागर.

मोबाईल हे एक असे साधन झाले आहे, की ज्याच्यावाचून घरातील लहान-मोठी मुले-मुली राहूच शकत नाहीत. मोबाईल हे त्यांना एक प्रकारचे लागलेले व्यसनच आहे. त्यामुळे त्यांचा घरातील व्यक्तींबरोबरचा संवाद कमी कमी होत आहे. पूर्वी शाळेतून घरी आले, की दप्तर टाकले की हात-पाय धुवून खाऊ खावून कधी अंगणात खेळायला जाते, असे व्हायचे. पण, आता त्याच अंगण व मैदानाची जागा मोबाईलच्या स्क्रीनने घेतली आहे. कोडी, बुद्धिबळ, नवा व्यापार, सापशिडीसारख्या मनोरंजन व बौद्धिक खेळाची जागा मोबाईलमधील गेमने घेतली आहे.

मोबाईलचा उपयोग नातेवाईक, जुने मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहण्यासाठी केला जात होता. पण, बघता-बघता मोबाईल हे प्रत्येकाच्या हातातील एक खेळणेच झाले आहे. त्यातून सगळेच मोबाईलच्या अधीन झालेले दिसतात. देशात आज कोट्यवधी लोक मोबाईलचा वापर करतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. या मोबाईलमुळे आपल्याला नकळत काही विकारांना सामोरे जावे लागत आहे. मोबाईलमधून काही विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडतात आणि या लहरी शरीरातील पेशींना हानी पोचवून शरीराचे नुकसान करतात.

मोबाईलवर एखाद्या विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर इंटरनेटद्वारे जलद गतीने मिळते. परंतु, त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे, की मुलांची एकाग्रता व नवीन शिकण्याची क्षमता कमी होत आहे. आजकालची मुले मोबाईलवर गेम्सच जास्त प्रमाणात खेळताना दिसतात. अशा मुलांना अल्झाथमसारख्या आजारांनाही सामोरे जाव लागते. मोबाईलमुळे आपण आपल्या माणसांमुळे दूर गेलो आहे. पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्यातली मजा आता हरवत आहे. आताच्या धावपळीत कोणाकडे वेळच नाही. जागतिकीकरणात लोक चालत नाहीत, तर सुसाट पळत आहेत. 100 वर्षांचे जगणं त्यांना दहा वर्षांत जगायचंय. लोकांशी व्यक्‍तिगत पातळीवर असलेला संपर्क मोबाईलमुळे तुटतो. एकमेकांमध्ये संवाद कमी होत आहे.

आपण मोबाईल जपून वापरला पाहिजे. मोबाईलचा वापर जेवढा चांगला, तेवढा एकमेकांमध्ये संवाद कमी होत आहे. मोबाईलचा वापर जपून झाला पाहिजे. समाजात आज-काल एवढ्या घटना मोबाईलमुळे घडत आहेत, की आपण आधीच अशा बाबींपासून आपले आणि आपल्या कुटुंबांचे रक्षण करावयास हवे..!

अन्याय करणारा झुकेल एवढं कर्तृत्ववान बना
-स्नेहल काळंगे.

"सातच्या आत घरात' हा निर्णय आजही पालकांना आपल्या मुलींच्या संदर्भात लागू करावासा वाटतो. याचं कारण काय? आजची स्त्री खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे का?

मनात शंकेचा हिमालय उभा राहतो. कारण, समाजातील अत्याचार सहन करून स्त्री शिक्षणात पुढाकार घेणारी एक महिलाच होती आणि पुरुष प्रधान संस्कृतीत परदेशात शिकून डॉक्‍टर पदवी मिळविणारी पण एक स्त्रीच होती. आज या सावित्रीच्या लेकी कुठेतरी स्वसंरक्षणाच्या बाबतीत मागे राहिल्यात. एखादी भयानक घटना घडल्यानंतर देश जागा होतो, स्त्रिया जागृत होतात. पण, अशा घटना, असे अत्याचार होऊ नयेत यासाठी पूर्वनियोजन का केले जात नाही? अशा घटना पुन्हा घडणार तर नाहीत ना?

आजची स्थिती बघता स्त्रियांना खरंच स्वसंरक्षणाची गरज आहे. जिथे सुजलाम, सुफलाम असणाऱ्या भारताने एवढी प्रगती केली आहे, तिथेच दुसऱ्या बाजूला स्त्रियांवरचे अत्याचार, हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ, लहान मुलींचे शोषण याला सीमा उरली नाही. कायद्याने स्त्रियांसाठी एवढ्या तरतुदी केल्या असताना त्या फक्‍त सहन करताहेत. कुठेतरी हे थांबायला हवंय. त्याची सुरवात कोणी केली असेल, ही पण जर केली नसेल तर त्या आजपासूनच करा. उद्या आपल्याच मुली सुरक्षित असणार आहेत.

"ऐरण होशील, तेव्हा घाव सोस, हातोडा होशील, तेव्हा घाव घाल.'

ऐरण होऊनच जगत आलोय. पण, आता हातोडा बनून डोळ्यांनी "बलात्कार' करणाऱ्यांवर घाल घालण्याची वेळ आली आहे. आयुष्यात कोणताही प्रसंग असो, संकट असो, त्याला सामोरे जाण्याची ताकद निर्माण करा. जर कोणी तुमच्यावर अन्याय केला, तर कायद्यानुसार रक्षक असलेल्या पोलिसांशी "निर्भय' बनून संपर्क साधा. कारण, "अन्याय करणाऱ्यांइतकाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो.' स्वत:च्याच बाबतीत एवढं कर्तृत्ववान बना की, अन्याय करणारा झुकलाच पाहिजे. समाजाला मान मिळवून देणारी प्रत्येक स्त्री जेव्हा स्वत:चं रक्षण करेल, तेव्हाच या सावित्रीच्या लेकी भविष्यात देशाचं भवितव्य घडवतील.
 

रक्तदान केल्यानंतर उमगले ते श्रेष्ठदान !
- प्राजक्ता कुंभार.

रक्तदान हेच श्रेष्ठदान, असा प्रसार नेहमी समाजामध्ये केला जातो. पण, याचा अर्थ खरंच केव्हा कळेल तेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष रक्तदान करता. गतवर्षी आमच्या वाय. सी. कॉलेजमध्ये अक्षय बल्ड बॅंकेने रक्तदान शिबिर घेतले होते. माझ्या मैत्रिणींना रक्तदान करताना पाहून माझ्याही मनात रक्तदान करण्याचा विचार आला. पण, धाडस होत नव्हते. मित्र-मैत्रिणींना विचारू की घरी, हा प्रश्‍न माझ्यापुढे आला. मी शिबिरातील डॉक्‍टरांकडे गेले आणि मला रक्तदान करावयाचे आहे असे सांगितले. त्यांनी माझे वजन तसेच हिमोग्लोबिनची मात्रा तपासली. त्यानंतर मला रक्तदान करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात, असे सांगितले. तरीही माझ्या मनातील भीती काही जात नव्हती. अखेर धाडस करून मी रक्तदान केले. मी खूप आनंदित झाले. एक नवी स्फूर्ती माझ्यात निर्माण झाली होती. त्याच वेळी ही बाब घरी कळाली तर काय, असा प्रश्‍न माझ्या मनात घोंगावू लागला. नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये घडणाऱ्या चांगल्या, वाईट गोष्टी मी आईबरोबर शेअर केल्या. त्यात मी रक्तदान केल्याचे हळूच शेवट सांगितले. झाले त्यावर आईने लगेच कशाला, काय गरज होती, काय झाले असते, अशी भुणभुण सुरू केली. आई माझ्या काळजीपोटी बोलत होती हे मला समजले. मी तिला समजावले अगं रक्तदान करणे हे वाईट नसते. तुझ्या शरीरात हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण असेल आणि वजन योग्य असेल तर तू देखील रक्तदान करू शकतेस. स्त्री आपल्या दैनंदिन आयुष्यात इतकी व्यस्त झाली आहे की, तिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. सध्या सर्वत्र महिलांनी रक्तदान करावे, यासाठी जागृती केली जात आहे. हिमोग्लोबिनची तपासणी आणि ते वाढावे यासाठी प्रयत्न होत आहेत. रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो. हे सगळे ऐकून आईने मला

घट्ट मिठी मारून पुढच्या वेळेस मी देखील तुझ्याबरोबर रक्तदान करण्यासाठी येईन, असे जाहीर करून टाकले.

नाती बंधने नसून जगण्याचे बळ...
- रविना मोहन कुंभार

स्वत:ला समाजशील आणि बुद्धिमान म्हणवून घेणारे आपण नाती जपण्यात इतके अपयशी का ठरतो, कारण आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक काटे इतरांना बोचत असतात. आपण जन्माला येताना असंख्य नाती घेऊन जन्माला येतो. ही नाती जपताना अनेकदा स्त्रीला तारेवरच कसरत करावी लागते. नातेसंबंध जपताना आपले मित्र-मैत्रिणी, शेजारी किंवा दैनंदिन जीवनात भेटणाऱ्या व्यक्ती असतील. या सर्वांना

रोज भेटणे शक्‍य नसेल तरीही सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात नाते जपण्याचे माध्यम फेसबुक, व्हॉटस्‌ऍपमुळे तयार झाले आहेत.

My brothers and sisters of America असे म्हणणाऱ्या विवेकानंदजी..., ने मजसी ने...म्हणणाऱ्या सावरकरांची आणि मृत्यूनंतर आपली रक्षा भारतभूमीच्या कणात मिसळावी, अशी इच्छा बाळगणाऱ्या पंडित नेहरूंची आपली संस्कृती आहे. मग तरीही All indians are my brothers and sisters हे फक्त प्रतिज्ञेतच का, आपल्या वागणुकीत का नाही. खरे बघायला गेले तर आपली वागणूक इतर अनेक बाबतीत चुकीचीच असते. अनंत अशा अवकाशातील ग्रहांना बांधून ठेवणारे सूर्याचे गुरूत्वाकर्षण किवा सूक्ष्म कणांमधील अणुरेणूमधील बंध याद्वारे निसर्ग आपल्याला नाती जपण्याचे तत्त्व शिकवतो. पण, आपल्याला ते कळत नाही.

नाती हा दोन अक्षरी शब्द पण तो जपण्यासाठी माणसाला किती आटापिटा करावा लागतो. आपण जन्माला येताना असंख्य नाती घेऊन जन्माला येतो. प्रत्येकजण आपापल्यापरिने आपल्याला प्रेम देते. ही झाली रूढ नाती. या व्यतिरिक्त अजून खूप नाती शिल्लक असतात. आपले मित्र-मैत्रिणी असतील, शेजारी असतील किंवा दैनंदिन जीवनात भेटणाऱ्या व्यक्ती असतील. या सर्वांना रोज भेटणे शक्‍य नसेल तरीही इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्‌सऍपमुळे यांच्याशी असलेले नाते आपण जपत आहोत.

स्त्रीला कायम वाटत राहते की, मी घरासाठी, घरातल्या लोकांसाठी इतके करते तर मी सांगते तसे इतरांनी वागायला पाहिजे. त्यात मायेची भावनाही असते. पण, समोरच्या माणसाला ते बंधन वाटू शकते. स्त्री एकाचवेळी अनेक नात्यांमध्ये गुरफटलेली असते. ती सगळी नाती जपताना तिला तारेवरची कसरत करावी लागते. पण, प्रत्येक नात्याचे महत्त्व ओळखून त्याच्याशी "डील' करायचं ठरवलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. स्वत:ला समाजशील व बुद्धिमान म्हणवून घेणारे आपण नाती जपण्यात इतके अपयशी का ठरतो, कारण आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक काटे इतरांना बोचत असतात. समोरच्याला प्रभावित करण्यापेक्षा त्याच्यावर प्रभुत्व गाजविणे आपल्याला जास्त

महत्त्वाचे वाटते. शिवाय समोरचा आहे, तसा त्याला स्वीकारणे आपल्याला कधीच जमत नाही. खरे म्हणजे नाती ही बंधने नसून आपल्या जगण्याचे बळ आणि आधारस्तंभ आहेत. हे विश्‍वची माझे घर... म्हणणाऱ्या ज्ञानोबांचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी आपलीच आहे. म्हणूनच वेगाने पुढे पडणारी काळाची पावले लक्षात घेता जरा मी आणि माझे...याच्या पलीकडचा विचार करूया...आणि चला नाती जपूया...!!
 

करिअरमधून घेऊ प्रगतीची भरारी...!
- प्राजक्ता ढाणे

देश स्वतंत्र झाल्यानंतर महिलांचे समाजातील स्थान व त्यांच्या समाजातील भूमिकेत आमूलाग्र बदल झालेला दिसतो. दैनंदिन जीवनात विविध भूमिका पार पाडणाऱ्या महिला आज समाजाच्या आधारस्तंभ बनल्यात. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने व कोमलतेने त्या निभावतात. पूर्वीच्या काळात ज्या स्त्रीला घराचा उंबरठा ओलांडण्याची परवानगी नव्हती, तीच स्त्री आज समाजात ताठ मानेने वावरताना आपण पाहतो. स्त्रियांच्या भूमिकांत झालेला हा बदल त्यांनी स्वत:च्या सक्षमीकरणासाठी उचललेल्या ठोस पावलांमुळेच घडला आहे. तरीही जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. आजही महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व व सामाजिक अत्याचारांच्या बळी पडल्याची उदाहरणे आहेत.

जीवनात प्रगती करण्याचे "शिक्षण' हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हाच मार्ग महिलांच्या प्रगती व सक्षमीकरणासाठी परिणामकारक ठरला. शिक्षणामुळेच करिअरच्या अनेक संधी त्यांना उपलब्ध झाल्या. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. कोणतेही असे क्षेत्र नाही की, जिथे महिलांनी ठसा उमटवलेला नाही. स्वत:ला दुर्बल न समजता स्वतःच्या सामर्थ्यावर विश्‍वास ठेऊन महिला वाटचाल करीत आहेत, हेच त्यांच्या कर्तृत्वामागील गुपीत आहे. पोलिस, संरक्षण विभागात महिला उल्लेखनीय काम करताहेत. शासनातही वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी नावलौकिक मिळवला आहे. क्रीडा, कला, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय... कोणतेही क्षेत्र घ्या, महिलांच्या कर्तृत्वाला डावलता येत नाही. नामांकित कंपन्या, उद्योगातही वरिष्ठपदांवर महिला कार्यरत आहेत. त्यांना सिद्ध करायला अजूनही भरपूर संधी आहेत. त्यासाठी प्रत्येक महिलेला "स्व'ची जाणीव झाली पाहिजे. समाजानेही तिला पाठबळ द्यायला हवे. प्रत्येक युवती ही स्वतःचे शिक्षण, भवितव्य व करिअरबाबत जागरुक आहे. प्रत्येक क्षेत्र महिलांसाठी खुले आहे. त्यात त्या नोकरी, व्यवसाय, उद्योग करू शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवतींची संख्या पाहता त्यांची करिअरबाबतची धडपड जाणवते. करिअर करताना महिलांना अजूनही खूप मोठी झेप घ्यायची आहे. विविध संधीतून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे आहे. त्यासाठी त्यांनी धिटाई व आत्मविश्‍वासाने स्पर्धेला सामोरे जायला हवे.

कर्तव्य पार पाडणे ही नैतिक जबाबदारी
- सोनाली कचरे

केशवसुतांनी मागितलेल्या तुतारीतून सामाजिक बांधिलकीची पुरेपूर शिकवण आपल्याला मिळते. "एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घ ज्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज आणून' ही त्यांची वाक्‍ये. का, कशासाठी तर तुतारीच्या सुरांबरोबर समाजाचा ध्वज उंच करा रे म्हणजेच भोवतालच्या समाजातील विषमता, अन्याय यांच्याविरुद्ध त्यांना ती तुतारी फुंकायची होती. सामाजिक दृष्टिकोन बदलणे, ही काळाची गरज आहे. सामाजिक कर्तव्य पार पाडणे, ही तशी प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. ती स्वयंप्रेरणेने स्वीकारण्याला सामाजिक बांधिलकी म्हणता येईल. समाजातील वंचितांना मदतीचा हात देणे, माणसा-माणसांतील संवाद वाढविणे, ही काळाची गरज आहे. नातेवाईक व मित्र-मैत्रिणींच्या अडचणीच्या काळात किंवा एखाद्या दु:खद प्रसंगात प्रत्येक जण मदत करत असतो. परंतु, ती अधिक व्यापक करण्याची गरज आहे. आपल्या ओळखीच्या नसणाऱ्यालाही आपला मदतीचा हा पुढे गेला पाहिजे. समाजातील जातीवाद, धर्म भेद, देवदेवतांवरून होणारी भांडणे यामुळे एकाच समाजात राहून माणसा-माणसांत दुरावा निर्माण होतो आहे. या गोष्टी बदलण्यासाठी कृती करणे, हाही एक सामाजिक बांधिलकीचाच भाग आहे. त्याबरोबर अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून आपण सामाजिक भान जपू शकतो. जखमी रुग्णांना नेण्याच्या प्रसंगी तोंड न फिरवणे यातूनही जबाबदारीची जाणीव जपू शकतो. नैसर्गिक आपत्तीत मदतीला धावणे, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये आपले योगदान देणे, हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आधार देणे, रक्तदान करणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे अशा कामांतूनही आपण सामाजिक बांधिलकी जपू शकतो. आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com