कालचे शत्रू...आजचे मित्र!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने कालचे शत्रू आज मित्र बनले. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाडिक गटाचे राजकारण संपवण्याची वल्गना केलेले ‘जनसुराज्य’चे विनय कोरे हेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. अशीच स्थिती सरूडकर-कोरे, आवाडे-हाळवणकर, आवाडे-शेट्टी यांची झाली आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने कालचे शत्रू आज मित्र बनले. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाडिक गटाचे राजकारण संपवण्याची वल्गना केलेले ‘जनसुराज्य’चे विनय कोरे हेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. अशीच स्थिती सरूडकर-कोरे, आवाडे-हाळवणकर, आवाडे-शेट्टी यांची झाली आहे. 

यावरून राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही, हेच स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक विजयी झाल्या. त्यांच्या विजयात ‘जनसुराज्य’सह माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, चंद्रदीप नरके यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. दीड वर्षापूर्वीच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत श्री. कोरे यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सतेज पाटील यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी पुणे येथे झालेल्या आघाडीच्या मतदारांच्या बैठकीत महाडिकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची घोषणा श्री. कोरे यांनी केली होती. पण अवघ्या दीड वर्षात ते भाजपसोबत व या निवडणुकीत महाडिकांच्या मांडीला मांडी लावून बसले. 

इचलकरंजीतील प्रकाश आवाडे-आमदार सुरेश हाळवणकर वाद तर दहा वर्षांपासून जिल्हा बघत आहे. इचलकरंजी नगरपालिकेतील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात श्री. हाळवणकर किंगमेकर ठरले. राष्ट्रवादीचेच सात नगरसेवक फोडून त्यांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. पण या निवडणुकीत या दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात गळे घातले. हेच चित्र ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी व आवाडे यांच्यात पाहायला मिळाले. लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत आवाडे गटाला श्री. शेट्टींनी धूळ चारली. पण अध्यक्ष निवडीतच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेट्टी यांनी आवाडेंशी आघाडी केली. जिल्हा परिषदेत पाच वर्षे काँग्रेससोबत राहिलेले श्री. शेट्टी सत्तास्थापनेत मात्र आवाडे यांच्याबरोबर भाजपच्या मदतीला धावले. 
शाहूवाडीतील आमदार सत्यजित पाटील व श्री. कोरे यांच्यातील संघर्षही दहा वर्षांपासूनचाच. दोन वेळा सरूडकर व कोरे अशी लढत होऊनही या निवडणुकीत ते दोघे एकत्र आले. ‘गोकुळ’च्या व जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार संजय घाटगे यांचे ‘गॉडफादर’ अशीच पी.एन. यांची ओळख होती; पण तेही त्यांना सोडून महाडिकांकडे गेले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व पी. एन. यांच्यातही फारसे सख्य नव्हते. ‘गोकुळ’, विधान परिषद निवडणुकीत या दोघांतही खटके उडाले होते; पण महाडिकांना शह देण्यासाठी सतेज यांनी पी. एन. यांचा आश्रय घेतला. त्यात त्यांना यश आले नसले तरी या घडामोडीत ते अग्रेसर राहिले. 

कोरे-मुश्रीफ दोस्तीतही अंतर
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्री. कोरे यांनी ठाम भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा मार्ग सुकर झाला. या निवडणुकीत पी. एन. यांना अध्यक्ष करण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची खेळी यशस्वी होण्याची शक्‍यता असतानाच श्री. कोरे हे श्री. मुश्रीफांच्या मदतीला धावले. महापालिका, जिल्हा परिषदेतही या दोघांतील दोस्ताना घट्ट होता; पण त्यातही अंतर आल्याचे या घडामोडीवरून स्पष्ट होते.

Web Title: yesterday enemy todays friend