"एस' वळणावर आणखी किती बळी ? ;  नवीन बोगद्याची घोषणा हवेत

प्रवीण जाधव
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पुणे-बंगळूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये खंबाटकी घाटामध्ये पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बोगदा तयार करण्यात आला. परंतु, या बोगद्याच्या पुढील रस्ता बनविताना झालेली "एस' वळणाची त्रुटी अनेकांची जीव घेणारी ठरली आहे. 

सातारा. : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेल्या "एस' वळणावर आज सकाळी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढत असलेल्या पोलिस हवालदारासह तिघे जखमी झाले. मृत्यूची शंभरी ओलांडणाऱ्या या ब्लॅक स्पॉटवर उपाय काढण्याच्या अनेक वल्गना झाल्या. नवीन बोगद्याच्या कामाला सुरवात करण्याच्या घोषणा केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांपासून अनेक लोकप्रतिनिधींनी केल्या. परंतु, प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. अनेकांच्या जिवावर उठणाऱ्या या प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर पोलिसांनी आता तरी ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.
 
पुणे-बंगळूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये खंबाटकी घाटामध्ये पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बोगदा तयार करण्यात आला. परंतु, या बोगद्याच्या पुढील रस्ता बनविताना झालेली "एस' वळणाची त्रुटी अनेकांची जीव घेणारी ठरली आहे. खंडाळा बोगद्याच्या पुढे असलेल्या धोकादायक "एस' वळणावर गेल्या दहा वर्षांत शंभरपेक्षा जास्त जणांची आयुष्यरेषा संपवली आहे. शेकडोंना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.

एवढ्या कुटुंबांना उघड्यावर आणणारी ही चूक दुरस्त करण्याचे काम मात्र, प्रशासनाला अद्याप जमलेले नाही. प्रशासनाला, महामार्ग प्राधिकरणाला याची जाणीव नाही, असेही नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेला. त्यातून स्थापन झालेल्या समितीने हे वळण "ब्लॅक स्पॉट' म्हणून जाहीर केले. या समितीने तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजनाही सुचविल्या. मात्र, केवळ तात्पुरते उपाय करण्यातच प्रशासनाने धन्यता मानली.
 
या वळणावरची कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवीन बोगद्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याचा आरखडा तयार होऊन मंजुरीही मिळाली. दोन-तीन महिन्यांत काम सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते. या कामाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी सत्कारही केला. भाजपच्या जिल्ह्यातील प्रचारामध्येही या कामाचा समावेश होता. परंतु, वर्ष उलटले तरी, अद्याप या बोगद्याच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळेच आज या वळणावर झालेल्या अपघातानंतरची परिस्थिती हाताळणाऱ्या पोलिसाला गंभीर जखमी व्हावे लागले आहे.
 
केवळ हलगर्जीपणाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करूनही आता उपयोग नाही. चुकीच्या पद्धतीने रस्ता तयार करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला गेला पाहिजे. तरच हे मृत्यूचे तांडव थांबण्यासाठी ठोस प्रयत्न होऊ शकतात. खासगी निमआराम बसच्या अपघातानंतर खंडाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक श्रीधर जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. तसेच ठोस उपाययोजनांच्या आखणीला वेग आला होता. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही आता अशीच ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे नागरिकांतून व्यक्त होत आहे. 
 

"एस' वळणावरील प्रमुख अपघात 
 

तारीख वाहन मृत जखमी
03 एप्रिल 2014 ट्रॅव्हल्स 06 39 
13 जानेवारी 2014 क्रुझर 09 05
16 नोव्हेंबर 2014 कंटेनर 08 00

  याबराेबरच 11 एप्रिल 2018 कालावधीत टेम्पो या वाहनाचा अपघात हाेऊन सुमारे 18  जण मयत झाले तसेच 19 जण जखमी झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yet How many more victims at S's turn ?