चला, घडू या देशासाठी...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

नोंदणीला प्रतिसाद - यिन समर यूथ समिटला 23 मेपासून प्रारंभ

नोंदणीला प्रतिसाद - यिन समर यूथ समिटला 23 मेपासून प्रारंभ
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमण्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'चे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-"यिन' या व्यासपीठाच्या माध्यमातून येथे 23 ते 25 मे या काळात "यिन समर यूथ समिट'चे आयोजन केले आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सलग तीन दिवसांचे शिबिर असेल. तरुणाईला उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करून ऊर्जा देण्यासाठी व तरुणांनी स्वतःला घडवतानाच देशालाही घडवावे, या हेतूने स्वतःचा शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकास व्हावा म्हणून हे "समर यूथ समिट' मोलाची भूमिका बजावणार आहे. तरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी "यिन' राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहे.

यंदाच्या समर यूथ समिटमध्ये राज्यातील तज्ज्ञ मंडळी तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्थेसह तीन दिवसांत जेवण, शिबिर किट, बॅच आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत ते होईल.

सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रेटींशी संवाद, डिजिटल व ऑनलाइन मार्केटिंग आणि सायबर क्राइम, ऑनलाइन बॅंकिंग, स्टार्टअप- द नेक्‍स्ट बिग थिंग, इमेज बिल्डिंग, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद, क्रीडा व करिअरविषयी मार्गदर्शन, प्रेझेंटेशन स्किल्स अशा विविध विषयांवर विविध सत्र होतील.

यात देश-विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शक तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यातून प्रत्येकाला नवी प्रेरणा आणि दिशा मिळणार आहे. यात सहभागासाठी "यिन' सदस्यांना दोनशे रुपये आणि इतर विद्यार्थ्यांना चारशे रुपये प्रवेश शुल्क असेल. चला तर मग आजच नोंदणी करू या...!

कुठे - भाषा भवन हॉल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
कधी - 23 मे ते 25 मे 2017
केव्हा - सकाळी दहा ते सायंकाळी सहा
अधिक माहितीसाठी- 9970876972, 8888166114

मान्यवर वक्ते असे...
शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, याहूस डिजिटल मार्केटचे संस्थापक संजय खांडगे, नीलय मेहता, पोलिस उपअधीक्षक शीतल जाधव, प्रसिद्ध जाहिरातकार अनंत खासबारदार, कबड्डी प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी, प्रसिद्ध दुर्गअभ्यासक डॉ. अमर अडके.

Web Title: yin summer youth samit registration